महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळीचे संकट! 30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बदलत्या हवामानाचा मोठा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केलेले असतानाच आता पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्याता आला. आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. 30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान राज्यात अवकाळी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

30 मार्चपासून राज्यात ढगाळी हवामान आणि दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 30 मार्च रोजी प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. उर्वरित विदर्भात देखील काही प्रमाणात हवामानात बदल दिसून येऊ शकतो.

30 मार्चच्या तुलनेत 31 मार्च रोजी एकंदरीत वादळी पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, या भागांमध्ये काही प्रमाणात अस्थिर हवामान आणि वादळी पाऊस पडू शकतो.

शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन

त्यानंतर 1 ते 4 एप्रिल दरम्यान वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे, असेही आवाहन करण्यात येत आहे.

Comments are closed.