गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, तसेच महामार्गावरील संभाव्य वाहतूक कोंडी टाळता यावी, यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर गणेशोत्सवादरम्यान 16 टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनक्षमता असलेल्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.

परिवहन विभागाने यासंदर्भातील अधिकृत आदेश लागू केला आहे. गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळामार्फत कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी मोठ्या प्रमाणावर जादा बसेस सोडल्या जातात. याशिवाय खासगी वाहनांची वर्दळही प्रचंड वाढते. अशा वेळी अवजड वाहने, ट्रेलर्स आणि रेती/वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे महामार्गावर मोठी कोंडी निर्माण होऊन प्रवाशांची गैरसोय होते. हे टाळण्यासाठी मोटार वाहन अधिनियमातील तरतुदींनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

कधी असेल अवजड वाहनांना बंदी?

आगमन व पूर्वतयारीचा प्रवास:

11 सप्टेंबर 2026 (मध्यरात्री 00:01 वाजेपासून) ते 15 सप्टेंबर 2026 (रात्री 11:00 वाजेपर्यंत)
2. पाच दिवसांचे गणपती विसर्जन – परतीचा प्रवास:
18 सप्टेंबर 2026 (सकाळी 08:00 ते रात्री 11:00 वाजेपर्यंत)
3. गौरी-गणपती विसर्जन (सात दिवस) – परतीचा प्रवास:
19 सप्टेंबर 2026 (सकाळी 08:00 ते रात्री 11:00 वाजेपर्यंत) आणि 20 सप्टेंबर 2026 (रात्री 11:00 वाजेपर्यंत)
4. अनंत चतुर्दशी (विसर्जन व परतीचा मोठा प्रवास):
25 सप्टेंबर 2026 (सकाळी 08:00 वाजेपासून) ते 26 सप्टेंबर 2026 (रात्री 8:00 वाजेपर्यंत)

या वाहनांना बंदीतून सवलत

प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून अवजड वाहनांवर निर्बंध असले, तरी जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवांवर याचा परिणाम होणार नाही याची खबरदारी शासनाने घेतली आहे. खालील वाहनांना या निर्बंधातून वगळण्यात आले आहे:
जेएनपीटी आणि जयगड बंदरातून आयात-निर्यात होणाऱ्या मालाची वाहतूक करणारी वाहने.

दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे एलपीजी (LPG) सिलिंडर, औषधे, लिक्विड ऑक्सिजन, भाजीपाला, अन्नधान्य व नाशवंत माल वाहून नेणारी वाहने.

रुग्णवाहिका, पोलीस वाहने, अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापन व इतर अत्यावश्यक सेवांची वाहने.

मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे आणि दुरुस्तीचे साहित्य वाहून नेणारी वाहने (या वाहनांना वाहतूक पोलीस/महामार्ग पोलिसांचे प्रवेशपत्र आवश्यक राहील).

तसेच, स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन गरजेनुसार निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार नवी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि संबंधित जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत.

या आदेशामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांना, कोकणवासियांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.