एकनाथ शिंदे आणि त्यांच्या माणसांकडे दुर्लक्ष करा, अमित शहांचा देवेंद्र फडणवीसांना सल्ला – संजय राऊत

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या माणसांकडे दुर्लक्ष करा, असा सल्ला अमित शहांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना यांना दिला अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली. तसेच तुम्ही तुमच्या पद्धतीने राज्य करा अशा प्रकारच्या सूचना दिल्लीच्या वरिष्ठ नेत्यांनी फडणवीसांना दिल्याचेही संजय राऊत म्हणाले.

मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, माझ्या पक्क्या माहितीनुसार दिल्लीतून मुख्यमंत्री फडणवीसांना सूचना दिल्या आहेत की या कटकटी होतच राहणार आहेत. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने राज्य करा अशा प्रकारच्या सूचना फडणवीसांना दिल्लीतल्या वरिष्ठांकडून पक्क्या सूचना देण्यात आल्या आहेत. एकनाथ मिंधे अमित शहांना भेटून पालकमंत्रीबाबत रडगाणं गात होते. तेव्हा शहा म्हणाले की देशाचे गृहमंत्री पालकमंत्री ठरवत नाहीत, हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. पालकमंत्रीपदासाठी देशाचा गृहमंत्री आदेश काढत नाही. तर तुम्ही हा विषय महाराष्ट्रातच संपवा. आणि मुख्यमंत्र्यांना शहांनी सांगितलंय की दुर्लक्ष करा फार गांभीर्याने घेऊ नका. यातला एकही शब्द खोटा नाही असे संजय राऊत म्हणाले.

माणसं जगवायची की कबुतरं, कुत्री, मांजरी जगवायची हा विचार भुतदयावाल्यांनी केला पाहिजे. या महाराष्ट्रात तीन महिन्यांत 700 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. कुत्रा चावल्यामुळे आणि रेबीजमुळे वर्षाला दोन लाखं लोकं बाधित होता आणि मरण पावतात. तर कुणाकडे लक्ष देणं गरजेचं आहे माणसांकडे. बाकी हे श्रीमंतांचे खेळ आहेत असेही संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत हे या मार्मिकचे उत्पादन आहे. आम्ही सगळे मार्मिक स्कूलचे विद्यार्थी आहोत. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मार्मिकच्या शाळेत टाकलं. मार्मिकमध्ये आम्हाला कामाला लावलं आणि त्या मार्मिकच्या प्रशिक्षण शाळेतून बाहेर आलो आणि इथपर्यंत आलो. मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिकाने त्यावेळी सरकारची झोप उडवली आणि मराठी माणसाला जागं केलं. मराठी माणसाच्या चळवळीची निर्मिती कुणी केली असेल तर ती मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिकाने केली आहे. मार्मिकमधून शिवसेना जन्माला आली आणि मार्मिकमधून हिंदुहृदय सम्राट जन्माला आले. त्यामुळे या मार्मिकचं महाराष्ट्रावर आणि मराठी समस्त माणसावर ऋण आहे. त्या मार्मिकचा आज वर्धापनदिन आहे, आम्ही सगळे त्या कार्यक्रमाला जाणार आहोत. फोक आख्यान नावाचा जबरदस्त सांस्कृतिक कार्यक्रम दाखवला जाणार आहे. स्वतः उद्धव ठाकरे येणार आहेत तिथे. पण मार्मिक हा इतिहास आहे आणि तो ज्वलंत राहणार आहे असेही संजय राऊत यांनी सांगितले.

Comments are closed.