विमानतळ परिसरात रमजानच्या नमाजसाठी परवानगी देता येईल का? हायकोर्टाची एमएमआरडीएला विचारणा
मुंबई विमानतळ परिसरात रमजानची नमाज अदा करण्यासाठी परवानगी दिली जाणार की नाही याचे उत्तर एमएमआरडीएने सादर करावे, असे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले.
छत्रपती शिवाजी महाराज डोमेस्टिक विमानतळ परिसरात नमाज अदा करण्यासाठी एक शेड होती. या परिसरात गेली 30 वर्षे रमजानची नमाज अदा केली जाते. ही शेड एमएमआरडीएने तोडली. नुकताच रमजानचा महिना सुरू झाला आहे. ही शेड तोडल्याने नमाज अदा करता येत नाही. रमजानचा नमाज अदा करण्यासाठी ही शेड पुन्हा बांधून द्यावी, अशी मागणी करत येथील तब्बल दोन हजार रिक्षा-टॅक्सी चालकांनी याचिका दाखल केली आहे.
न्या. बी. पी. कुलाबावाला व न्या. फिरदोश पुन्नीवाला यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. हा संवेदनशील विषय आहे. एमएमआरडीएने मानवतेच्या दृष्टिकोनातून विमानतळ परिसरात नमाज अदा करू द्या. कारण या रिक्षा-टॅक्सी चालकांनी भाडे नाकारल्यास प्रवाशांचे हाल होतील. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करून येथे नमाजसाठी परवानगी दिली जाणार की नाही याची माहिती एमएमआरडीएने सादर करावी, असे आदेश देत न्यायालयाने ही सुनावणी एक आठवडय़ासाठी तहकूब केली.
रमजान संपेल
या रिक्षा-टॅक्सी चालकांनी नमाजच्या परवानगीसाठी एमएमआरडीएकडे अर्ज करावा. या अर्जावर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे एमएमआरडीएचे वकील अक्षय शिंदे यांनी न्यायालयाला सांगितले. या प्रक्रियेतून परवानगीची अपेक्षा केल्यास रमजान महिना संपेल. त्यापेक्षा एमएमआरडीएच्या एका जबाबदार अधिकाऱयाने न्यायालयात येऊन ही परवानगी दिली जाणार की नाही हे सांगावे, असे खंडपीठाने नमूद केले.
चालकांकडून हमी घेतली जाईल
एमएमआरडीने येथे नमाजसाठी परवानगी दिल्यास ही शेड रमजाननंतर काढून टाकण्याची हमी या रिक्षा-टॅक्सी चालकांकडून घेतली जाईल. या हमीचे पालन न केल्यास भविष्यात येथे रमजानच्या नमाजसाठी परवानगी दिली जाणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
मशीदचा तपशील द्या
विमानतळ परिसरात 900 मीटर अंतरावर मशीद आहे. या रिक्षा-टॅक्सी चालकांनी तेथे रमजानची नमाज अदा करावी, असा पर्याय विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आला. ही मशीद पाडण्यात आल्याचा दावा चालकांनी केला. ही मशीद आहे की नाही याची संपूर्ण माहिती सादर करण्याचे आदेश न्यायालयाने विमानतळ प्रशासनाला दिले.
Comments are closed.