महिला डॉक्टरचा विनयभंग प्रकरण- केईएमच्या वरिष्ठ डॉक्टरचा जामीन हायकोर्टाने फेटाळला, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्देश

महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक टाळण्यासाठी हायकोर्टात धाव घेणाऱ्या केईएमच्या वरिष्ठ डॉक्टरला मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. या कृत्यामुळे पीडितेवर मानसिक व भावनिक आघात झाल्याचे स्पष्ट करत डॉक्टरचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायमूर्ती राजेश पाटील यांनी फेटाळून लावला आहे. रवींद्र देवकर असे त्या डॉक्टरचे नाव असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
आपल्या पदाचा गैरफायदा घेत तसेच नको त्या ठिकाणी स्पर्श केल्याचा आरोप कनिष्ठ महिला डॉक्टरने केला होता. सहा जणांनी डॉक्टरविरोधात अशा तक्रारी केल्या असून याप्रकरणी डॉ. देवकरविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अटक टाळण्यासाठी देवकर याने सत्र न्यायालयात अर्ज केला, मात्र सत्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळल्यानंतर त्याने हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. त्यावर न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने डॉ. देवकरवर असलेल्या आरोपांची गंभीर दखल घेत अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.
न्यायालयाचे निरीक्षण काय
याचिकाकर्त्याचा अटकपूर्व जामीन मंजूर केला तर ते सर्व तक्रारदार पीडितांवर सूड उगवण्याची शक्यता आहे. इतकेच नव्हे तर पुन्हा अशी कृत्ये याचिकाकर्ता करेल ही भीती नाकारता येणार नाही
देवकरविरोधात तक्रार करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2021 मध्येही महिला डॉक्टरने त्यांच्याविरोधात अशीच तक्रार केली होती.
अशा परिस्थितीत देवकरला जामीन दिल्यास ते उचित ठरणार नाही.
Comments are closed.