पूजा खेडकरला हायकोर्टाचा झटका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी माजी प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरला मोठा झटका दिला आहे. न्यायालयाने सुनावणीदरम्यान पूजाला अंतरिम जामीन मंजूर करण्यास नकार दिला. पूजा खेडकरवर नागरी सेवा परीक्षेत गैरव्यवहार आणि ओबीसी-दिव्यांगत्व कोट्याचा गैर लाभ घेण्याचा आरोप आहे.
न्यायाधीश चंदर धारी सिंह यांच्या खंडपीठाने अंतिम निर्णय होईपर्यंत खेडकर यांना देण्यात आलेली अंतरिम सुरक्षा वाढविली आहे. खेडकर तपासात सहकार्य करण्यास तयार असून कोठडीत चौकशी करण्याची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकील वीणा माधवन यांनी केला.
तपास सुरू असून मोठ्या कटाचा पर्दाफाश करण्यासाठी कोठडीत चौकशीत करण्याची आवश्यकता भासू शकते. तसेच कटाच्या काही पैलूंचा अद्याप तपास केला जाणार असल्याचा युक्तिवाद दिल्ली पोलिसांच्या वतीने वकील संजीव भंडारी यांनी केला.
पूजा खेडकरने 2021 मध्ये युपीएससी सीएसई परीक्षा 841 रँक मिळवत उत्तीर्ण केली होती. प्रशिक्षणानंतर जून 2021 मध्ये ती पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्त झाली होती. परंतु पहिल्या नियुक्तीदरम्यानच तिच्या विरोधात चौकशी सुरू करण्यात आली आणि याचदरम्यान तिची बदलीही करण्यात आली. कार्यालयात रुजू होण्यापूर्वीच अनुचित मागण्या केल्याचा आरोप तिच्यावर आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक अधिकाऱ्यांनी यासंबंधी लेखी तक्रार केली होती. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी मुख्य सचिवांकडे तक्रार केली होती.
प्रशिक्षणाच्या कालावधीतच शासकीय निवासस्थान, स्टाफ, वाहन आणि स्वतंत्र केबिनची मागणी केल्याचा आरोप खेडकरवर आहे. स्वत:च्या मालकीच्या ऑडी कारवर लाल-निळ्या रंगाचा दिवा आणि महाराष्ट्र सरकारचा लोगो तिने लावला होता.
Comments are closed.