मुंबई विद्यापीठाला दहा हजारांचा दंड, प्रतिज्ञापत्र न करणे भोवले

वेळेत प्रतिज्ञापत्र सादर न करणे मुंबई विद्यापीठाच्या चांगलेच अंगलट आले आहे. उच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेत विद्यापीठाला दहा हजारांचा दंड ठोठावला आहे.

तोंडी परीक्षा देता न आल्याने मितेश वरशने या विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याने याचिका दाखल केली आहे. न्या. रवींद्र घुगे व न्या. अश्विन भोबे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. गेल्या महिन्यात विद्यापीठाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. दोन आठवडय़ात हे प्रतिज्ञापत्र सादर होणे अपेक्षित होते. मात्र अद्याप हे प्रतिज्ञापत्र सादर झाले नाही, असे मितशने न्यायालयाच्या निदर्शनास आणले.

प्रतिज्ञापत्र तयार आहे. ते सादर केले जाईल, असे विद्यापीठाने खंडपीठासमोर स्पष्ट केले. यावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. वेळेत हे प्रतिज्ञापत्र सादर झालेले नाही. त्यामुळे विद्यापीठाला दहा हजारांचा दंड ठोठावला जात आहे, असे आदेश देऊन न्यायालयाने ही सुनावणी 1 ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली.

दंडाची रक्कम याचिकाकर्त्याला

दंडाची रक्कम 15 दिवसांत मितेशला विद्यापीठाने द्यावी. तसेच प्रतिज्ञापत्राची प्रत त्याला द्यावी, असे आदेशही खंडपीठाने दिले आहेत.

Comments are closed.