नातवासोबत घट्ट नाते असले तरी आजी पालकांपेक्षा श्रेष्ठ नाही, हायकोर्टाचा आई-वडिलांना दिलासा

पाच वर्षांच्या नातवासोबत घट्ट नाते निर्माण झाल्याचा दावा करत नातवाचा ताबा त्याच्या आई-वडिलांना सोपवण्यास नकार देणाऱ्या आजीला मुंबई हायकोर्टाने सुनावले. नातवाचा कितीही लळा लागला, घट्ट नाते निर्माण झाले तरी त्याचे अधिक चांगल्या पद्धतीने संगोपन आई-वडीलच करू शकतात असे स्पष्ट करत हायकोर्टाने नातवाला पालकांकडे सोपवण्याचे आदेश दिले.
सेरेब्रल पाल्सीने ग्रस्त असलेल्या दुसऱ्या जुळ्या मुलाची काळजी घेण्यासाठी दाम्पत्याने एका मुलाला आजीकडे सांभाळ करण्यासाठी ठेवले होते. मालमत्तेच्या वादामुळे वडिलांनी त्याच्या 74 वर्षीय आईला बाळाचा ताबा देण्याची विनंती केली तेव्हा तिने नकार दिला. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत दाद मागितली. न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी झाली. तेव्हा मुलाच्या आजीने या याचिकेला विरोध करत दावा केला की, ती जन्मापासूनच बाळाची काळजी घेत होती आणि त्यांच्यात भावनिक बंध निर्माण झाला आहे. त्यावर खंडपीठाने नमूद केले की, आजीचे बाळाशी भावनिक बंध असू शकतात, परंतु अशा आसक्तीमुळे तिला बाळाच्या जैविक पालकांपेक्षा श्रेष्ठ अधिकार मिळू शकत नाही. बाळाच्या पालकांमध्ये कोणताही वैवाहिक वाद नव्हता आणि वडील स्थानिक स्वराज्य संस्थेत नोकरीला आहेत. ते बाळाची काळजी घेण्यास असमर्थ आहेत हे दाखविणारे प्रतिवाद्यांकडे काहीही नाही. केवळ आजी आणि पालकांमधील वादांमुळे मुलाला त्याच्या पालकांची काळजी नाकारता येत नाही, इतकेच काय तर मालमत्तेशी संबंधित वाद पालकांना त्यांच्या कायदेशीर ताब्यापासून वंचित ठेवू शकत नाहीत.
कोर्ट काय म्हणाले?
n आजीला तिच्या नातवाचा ताबा ठेवण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही, विशेषतः ती 74 वर्षांची आहे.
n याचिकाकर्ता जैविक पिता आणि नैसर्गिक पालक असल्याने त्याला त्याच्या मुलाचा ताबा घेण्याचा निर्विवाद कायदेशीर अधिकार आहे.
n याचिकाकर्ता आणि त्याची पत्नी जुळ्या मुलांची काळजी घेण्यास भावनिक आणि आर्थिकदृष्टय़ा असमर्थ आहेत हे प्रतिवाद्यांना सिद्ध करता आले नाही.
n आजीने दोन आठवडय़ांच्या आत मुलाचा ताबा याचिकाकर्त्याकडे सोपवावा.
n पालकांनी आजीला नातवाला भेटण्याची परवानगी द्यावी.
Comments are closed.