‘एचएसआरपी’ ला वाहनचालकांचा अल्प प्रतिसाद; 30 जून शेवटची तारीख, 16 जूनपासून इतर कामांना ब्रेक

उच्च सुरक्षा वाहन क्रमांक (एचएसआरपी) बसवण्यासाठी 30 जून शेवटची दिनांक आहे. परंतु, अजूनही एचएसआरपीला वाहनचालकांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. एचएसआरपी बसवण्याच्या कामाध्ये गती येण्यासाठी परिवहन विभागाने आता 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांचे हस्तांतरण, नोंदणी प्रमाणपत्रामध्ये पत्ता बदल यांसह विविध कामांना ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला आहे.
परिवहन विभागाने राज्यातील 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट एचएसआरपी बसवून घेणे बंधनकारक केले आहे. यासाठी तीन खासगी कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 1 जानेवारीपासून एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यास सुरुवात झाली आहे. सातारा प्रादेशिक परिवहन विभागात 4 लाख 70 हजार 797 वाहने आहेत. त्यापैकी आतापर्यंत 79 हजार 877 दुचाकी, 1 हजार 216 तीन चाकी, 22 हजार 5 चारचाकी, 4 हजार 645 इतर वाहने, अशी मिळून 1 लाख 7 हजार 750 वाहनांनी एचएसआरपी नंबर प्लेट बसवल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाबुले यांनी सांगितले.
फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात 83 हजार 803 वाहने आहेत. त्यापैकी आतापर्यंत 11 हजार 877 दुचाकी, तीन चाकी 56, चारचाकी 6 हजार 151, इतर वाहने 926, अशी मिळून 19 हजार 10 वाहनांनी एचएसआरपी नंबर प्लेट बसवली असल्याची माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे यांनी दिली.
राज्यात सर्वच आरटीओंत एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्याच्या कामामध्ये गती येण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. यामध्ये 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांचे हस्तांतरण, नोंदणी प्रमाणपत्रामध्ये पत्ता बदल करणे, वित्त बोजा चढवणे, उतरवणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र देणे, ना हरकत प्रमाणपत्र जारी करणे, वाहनांमध्ये बदल करणे, आदी वाहनविषयक सर्व कामकाज एचएसआरपी नंबर प्लेट बसवल्याशिवाय 16 जूनपासून बंद करण्यात येणार आहे.
Comments are closed.