दिल्लीत उद्या हाय व्होल्टेज बैठक
मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर प्रमुख नेत्यांची होणार बैठक : सिद्धरामय्या-शिवकुमार यांना बोलावण्याची शक्यता
बेंगळूर : मुख्यमंत्रिपदावरून सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यातील संघर्ष पेटलेला असतानाच आता काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्रिपदाच्या अधिकार हस्तांतराचा प्रश्न सोडविण्यासाठी ठोस भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह तीन-चार प्रमुख नेत्यांना चर्चेसाठी दिल्लीला बोलावून घेतले जाईल, असे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे. याच दरम्यान, गुरुवारी बेंगळूरहून नवी दिल्लीला परतल्यानंतर खर्गे यांनी रात्री काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी शनिवार 29 रोजी बैठक निश्चित करण्यात आली. 1 डिसेंबरपासून नवी दिल्लीत संसदेच्या अधिवेशनाला प्रारंभ होणार आहे.
यानिमित्ताने शनिवारी काँग्रेसच्या संसदीय मंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर राज्यातील मुख्यमंत्रिपदावर तोडगा काढण्यासाठी प्रमुख नेत्यांची बैठक घेतली जाणार आहे. बुधवारी खासगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे दिल्लीहून बेंगळूरला आले होते. गुरुवारी दिल्लीला परतण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना त्यांनी, राज्य काँग्रेसमध्ये असणारी समस्या सोडविण्यासाठी राज्य नेत्यांना दिल्लीला बोलावून बैठक घेण्यात येईल. सिद्धरामय्या, शिवकुमार यांच्यासह प्रमुख तीन-चार नेत्यांना दिल्लीला बोलावून अधिकार हस्तांतरावर चर्चेद्वारे तोडगा काढण्यात येईल. काँग्रेस हायकमांड म्हणजे एकटी व्यक्ती नाही तर एक टीम आहे. सर्व वरिष्ठ नेते एकत्र बसून चर्चा करून समस्या दूर करतील, असे स्पष्ट केले.
मागील सात-आठ दिवसांपासून सिद्धरामय्या व डी. के. शिवकुमार यांच्या गटात मुख्यमंत्रिपदावरून वाद सुरू आहे. शिवकुमार यांना उर्वरित कालावधीसाठी मुख्यमंत्री बनवावे, अशी मागणी करत काही आमदारांनी वरिष्ठांवर दबाव आणण्यासाठी दिल्लीला धाव घेतली होती. मागील आठवड्यात खर्गे बेंगळूरला आले असता आमदार, मंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन सत्तावाटपाच्या गोंधळावर पडदा टाकण्याची विनंती केली होती. त्यानुसार सर्वांशी चर्चा करून दिल्लीला परतलेल्या खर्गेंनी बुधवारी राहुल गांधी यांच्याशी चर्चा करून कर्नाटकातील घडामोडी, मुख्यमंत्रिपदाचा वाद, गटबाजीचे राजकारण, गुप्त बैठका आणि आमदारांचा दिल्ली दौरा याबाबत माहिती दिली. तसेच गोंधळ दूर करण्याची विनंती केली. गुरुवारी रात्रीही खर्गे यांनी राहुल गांधींची भेट घेऊन तोडगा काढण्यासाठी शनिवार 29 नोव्हेंबर रोजी बैठक बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
सिद्धरामय्यांचे समर्थक मंत्री दिल्लीला जाणार?
सिद्धरामय्या यांच्याकडेच उर्वरित कालावधीसाठी मुख्यमंत्रिपद कायम ठेवण्याची मागणी करण्यासाठी त्यांच्या गटातील काही प्रभावी मंत्री दोन दिवसांत दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. शनिवारी या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी शनिवारी प्रमुख नेत्यांची बैठक होत आहे. त्यामुळे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्या नेतृत्त्वाखाली मंत्री सतीश जारकीहोळी, डॉ. एच. सी. महादेवप्पा, एच. के. पाटील यांच्यासह आणखी दोन-तीन मंत्री शुक्रवारी सायंकाळी किंवा शनिवारी सकाळी दिल्लीला जाऊन सिद्धरामय्यांच्यावतीने लॉबींग करण्याची शक्यता आहे.
मी 2028 मधील मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक; आता नाही : जारकीहोळी
राज्यात मुख्यमंत्रिपदावरून गोंधळ निर्माण झालेला असतानाच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या गटातील प्रभावी नेते व मंत्री सतीश जारकीहोळी यांनी मी 2028 च्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहे, आता नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. हावेरी येथे गुरुवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी, दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासोबत 2028 च्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. 2028 च्या निवडणुकीवेळी मी मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहे. सध्या मुख्यमंत्रिपदाचा मी विचार केलेला नाही, असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
अधिकार हस्तांतराच्या वादात स्वामीजींचीही उडी
राज्य काँग्रेस सरकारमधील अधिकार हस्तांतराच्या मुद्द्यावरून गोंधळ निर्माण झालेला असतानाच आता या मुद्द्यावरून विविध मठाधीशांनीही उघडपणे वक्तव्ये करण्यास प्रारंभ केला आहे. आदीचुंचनगिरी मठाचे डॉ. निर्मलानंदनाथ स्वामीजी यांनी वक्कलिक समुदायातील नेते डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनवावे, अशी मागणी केली आहे. मात्र, या वक्तव्यावर कागिनेते पीठाचे निरंजनानंदपुरी स्वामींनी आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्री बदलाच्या मुद्द्यावर मठाधीशांनी हस्तक्षेप करणे योग नाही, असे निरंजनानंदपुरी स्वामीजी यांनी म्हटले आहे. कागिनेले शाखा मठाच्या तिंथणी येथील सिद्धरामानंदपुरी स्वामीजींनीही आदीचुंचनगिरी मठाधीशांच्या वक्तव्याला आक्षेप घेतला आहे. मठाधीशांनी गोंधळ निर्माण होतील अशी वक्तव्ये करणे योग्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे. तर पट्टनायकनहळ्ळी येथील नंजावधूत स्वामीजींनी शिवकुमार यांच्या बाजूने विधान केले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे उत्तम प्रशासन सांभाळत आहेत. त्यांनी साडेसात वर्षे पद सांभाळले आहे. हायकमांडने शिवकुमार यांना वचन दिले असेल तर ते विसरता कामा नये. शिवकुमार यांना उर्वरित अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवावे, असे त्यांनी म्हटले आहे.
अहिंद समुदायाचा इशारा
सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रिपदावरून खाली उतरवल्यास काँग्रेस पक्षाला मोठा धक्का पोहोचेल, असा परखड इशारा ‘अहिंद’ (अल्पसंख्याक, मागासवर्ग, दलित) समुदायाने काँग्रेसश्रेष्ठींना दिला आहे. सिद्धरामय्या यांना पदच्युत करण्याचा कोणताही प्रयत्न पक्षावर परिणाम करणारा ठरेल, असे कर्नाटक राज्य मागासवर्ग समुदाय संघटनेने काँग्रेसला दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष के. एम. रामचंद्रप्पा पत्रकारांशी बोलताना म्हणाले, सध्या घडत असलेल्या घडामोडींमुळे तीव्र दु:ख होत आहे. शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रिपदाच्या रुपाने मोबदला देण्यात आला आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी समर्थकांची बैठक
मुख्यमंत्रिपद हस्तांतराच्या मुद्द्यावर काँग्रेस हायकमांड चर्चा करत असतानाच सिद्धरामय्या यांच्या गटातील नेत्यांनी वरिष्ठांवर दबाव आणण्यासाठी बैठका घेणे सुरुच ठेवले आहे. मंत्री सतीश जारकीहोळी आणि विधानपरिषद सदस्य बी. के. हरिप्रसाद यांनी चर्चा केली. याच दरम्यान तेथे पोहोचेले मंत्री एच. सी. महादेवप्पाही बैठकीत सहभागी झाले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या ‘कावेरी’ या निवासस्थानी झालेल्या बैठकीला मंत्री सतीश जारकीहोळी, डॉ. जी. परमेश्वर, ज्येष्ठ नेते बी. के. हरिप्रसाद व अहिंद समुदायातील प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी सिद्धरामय्या यांच्या समर्थनार्थ उभे राहण्याबाबत यावेळी चर्चा झाल्याचे समजते.
वरिष्ठांनी बोलावले तरच जाईन!
काँग्रेसश्रेष्ठींनी बोलावले तर दिल्लीला जाईन. हायकमांडने घेतलेल्या निर्णयाशी कटिबद्ध राहीन. हायकमांडच्या सूचनेचे पालन करेन. वरिष्ठांनी बोलावले तरच जाईन. त्यांना बोलवू द्या, नंतर पाहुया.
– सिद्धरामय्या, मुख्यमंत्री
हायकमांडने अद्याप दिल्लीला बोलावले नाही!
हायकमांडने बोलावल्यास दिल्लीला जाईन. हायकमांडने मला आणि मुख्यमंत्र्यांना दिल्लीला बोलावले तर मी सिद्धरामय्यांशी चर्चा करून दिल्लीला जाईन. दिल्लीभेटीचे अद्याप निमंत्रण मिळालेले नाही. मुंबईत खासगी कार्यक्रम असल्याने तेथे जात आहे. शुक्रवारी बेंगळुरात होणाऱ्या अंगडवाडी स्थापनेच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमात सहभागी होईन.
– डी.के. शिवकुमार, उपमुख्यमंत्री
Comments are closed.