MPL 2025: एमपीएल 2025 मध्ये तुटणार का हे हाय स्कोर? पाचही जणांनी मारली मोठी मजल
MPL 2025: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आयोजन करत असलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL 2025) स्पर्धेचा नवा हंगाम लवकरच सुरू होत आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या पुण्याजवळील गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा 4 जून ते 24 जून या कालावधीत खेळली जाईल. महाराष्ट्रातील सर्व क्रिकेटप्रेमी आतुरतेने या स्पर्धेची वाट पाहत असतात. या नव्या तिसऱ्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी, आपण काही महत्त्वाच्या आकडेवारीवरून जर टाकत आहोत. त्यातच, आतापर्यंत स्पर्धेच्या इतिहासात नोंदवल्या गेलेल्या सर्वोच्च पाच वैयक्तिक खेळ्यांबद्दल आपण जाणून घेऊया.
एमपीएल 2024 मध्ये सहभागी झालेल्या छत्रपती संभाजी किंग्स संघाचा कर्णधार राहिलेल्या मूर्तझा ट्रंकवाला (Murtaza Trunkwala) याच्या नावे एमपीएल इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या आहे. त्याने मागील हंगामात ईगल नाशिक टायटन्स संघाविरुद्ध खेळताना आपल्या संघाला 213 धावांचा यशस्वी पाठलाग करून दिला होता. त्यावेळी त्याने 122 धावांची खेळी केलेली. त्याच्या या खेळीत 11 चौकार व 7 षटकार समाविष्ट होते. स्पर्धेच्या नव्या हंगामात त्याचा हा विक्रम मोडण्याची संधी अनेक फलंदाजांकडे असेल.
स्पर्धेच्या सर्वात पहिल्या हंगामात वेगवान शतक झळकावत ईगल नाशिक टायटन्स संघाचा युवा अष्टपैलू अर्शिन कुलकर्णी (Arshin Kulkarni) चर्चेत आला होता. त्याने पुणेरी बाप्पा संघाच्या गोलंदाजांवर अक्षरशा तुटून पडत शतक ठोकलेले. त्याने या सामन्यात 117 धावांची वादळी खेळी केलेली. याच खेळीत त्याने एकाच डावात सर्वाधिक 10 षटकार ठोकण्याचा पराक्रम देखील केलेला. तसेच, एमपीएल 2024 मध्ये 97 धावांची खेळी देखील त्याच्या बॅटमधून आली होती. (Highest Individual Scores In MPL History)
एमपीएल इतिहासातील सर्वात पहिला शतकवीर होण्याचा मान अनुभवी अंकित बावणे (Ankeet Bawne) याने मिळवला होता. पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघासाठी खेळताना त्याने सलग दोन हंगामात ऑरेंज कॅप पटकावली आहे. अंकितने एमपीएल 2023 मध्ये रत्नागिरी जेट्स संघाविरुद्ध 105 धावांची अप्रतिम खेळी केली होती. हे स्पर्धेच्या इतिहासातील पहिले शतक होते. तसेच, हे आत्तापर्यंतचे एमपीएलमधील सर्वात संथ शतक देखील आहे. या शतकासाठी त्याने तब्बल 59 चेंडू खेळलेले.
मूर्तझा ट्रंकवाला याने ज्या सामन्यात 122 धावांची खेळी केली, त्याच सामन्यातील पहिल्या डावात मंदार भंडारी (Mandar Bhandari) याने शतकी तडाखा दिलेला. अखेरपर्यंत नाबाद राहताना त्याने 6 चौकार व 7 षटकारांच्या मदतीने 102 धावा केलेल्या. ही स्पर्धेच्या इतिहासातील चौथी सर्वात मोठी खेळी आहे. त्याच्या या शतकातरही ईगल नाशिक टायटन्स संघाला पराभूत व्हावे लागले होते.
एमपीएलच्या पहिल्या दोन हंगामात काही खेळाडू नर्व्हस नाईन्टीजचे शिकार झाले होते. रायगड रॉयल्स संघाचा अष्टपैलू सिद्धेश वीर (Siddhesh Veer) त्यापैकी एक होता. पुणेरी बाप्पा संघाविरुद्ध 168 धावांचा पाठलाग करताना त्याने, नाबाद 98 धावांची खेळी केली होती. दुर्दैवाने, त्याला आपले शतक पूर्ण करता आले नव्हते. असे असले तरी, ही स्पर्धेच्या इतिहासातील पाचवी सर्वात मोठी खेळी आहे. याव्यतिरिक्त अर्शिन कुलकर्णी (97 धावा) व अंकित बावणे (94 धावा) या खास यादीत येण्यापासून वंचित राहिले होते.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष व आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या एमपीएल 2025 च्या शुभारंभासाठी आता काहीच दिवस शिल्लक आहेत. पुण्यापासून जवळच असलेल्या गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियम 4 जून ते 24 जून या काळात ही नियोजनबद्ध स्पर्धा पार पडणार आहे. यावर्षी प्रथमच वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग देखील खेळली जाईल. संपूर्ण स्पर्धेचे लाईव्ह स्ट्रीमिंग JioHotstar या ओटीपी प्लॅटफॉर्मवर होईल. तर, Star Sports 2 या टीव्ही चॅनेलवर रंजक सामन्यांचा आस्वाद घेता येईल. एमसीएने सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये फ्री एन्ट्री देण्याचा निर्णय घेतला आहे. (MPL 2025 Live Telecast On JioHotstar OTT And Star Sports 2 Tv Channel)
Comments are closed.