येडियुरप्पा यांना 'सर्वोच्च' दिलासा
पोक्सो’ प्रकरणी अभियोग चालविण्यास स्थगिती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘पोक्सो’ प्रकरणात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते बी. एस. येडियुराप्पा यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्यावरील अभियोगास स्थगिती देण्यात आली आहे. येडियुराप्पा यांनी या संदर्भात याचिका सादर केली होती. आपल्यावरील अभियोग चालविण्यापूर्वी आपले म्हणणे उच्च न्यायालयाने ऐकून घ्यावे, असे येडियुराप्पा यांचे म्हणणे होते.
या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक सरकारला नोटीस पाठवून म्हणणे मांडण्याचा आदेश दिला आहे. येडियुराप्पा यांनी आधी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती. तथापि, उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली होती. तसेच त्यांना अभियोगाला सामोरे जाण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे त्यांच्यावर अभियोग च्ाालविण्याची सज्जता कर्नाटक सरकारने केली होती. येडियुराप्पा यांनी उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका (स्पेशल लीव्ह पिटिशन) सादर केली होती. उच्च न्यायालयाने आपले म्हणणे गुणवत्तेच्या आधारावर ऐकून घ्यावयास हवे होते. मात्र, उच्च न्यायालयाने आपल्याला अभियोगाला सामोरे जाण्याचा आदेश दिला आहे, असे म्हणणे येडियुराप्पा यांनी त्यांच्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेत मांडले आहे.
मर्यादित उद्देशासाठी नोटीस
सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्या. जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर येडियुराप्पा यांच्या याचिकेची सुनावणी मंगळवारी करण्यात आली. उच्च न्यायालयाने येडियुराप्पा यांची याचिका फेटाळली आहे. तथापि, उच्च न्यायालयाने काही मुद्द्यांकडे लक्ष दिलेले नाही, असे येडियुराप्पा यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा उच्च न्यायालयाकडे पाठवावे, अशी त्यांची मागणी आहे. यावर कर्नाटक सरकारचे काय म्हणणे आहे, ते आम्हाला जाणून घ्यायचे असल्याने आम्ही कर्नाटक सरकारला नोटीस पाठवीत आहोत, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या मंगळवारच्या आदेशात स्पष्ट केले आहे. कर्नाटक सरकार जोपर्यंत नोटीसीला उत्तर देत नाही, तोपर्यंत या अभियोगाला स्थगिती देण्यात येत आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्याने येडियुराप्पा यांना दिलासा मिळाला आहे.
Comments are closed.