हिंदीने 25 भाषांना संपवले, स्टॅलिन यांचा पुन्हा हल्ला; भाषा युद्ध चिघळणार

तामीळनाडूत हिंदीविरोधातील वाद आणखी चिघळत चालला आहे. तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी आज पुन्हा सरकारच्या हिंदी लादण्यावरून प्रचंड संताप व्यक्त केला. हिंदी भाषेच्या लादण्यामुळे गेल्या 100 वर्षांत उत्तर हिंदुस्थानातील तब्बल 25 भाषा संपवल्या, अशी टीका स्टॅलिन यांनी आज ‘एक्स’वरून केली. त्यामुळे तामीळनाडूतील भाषिक युद्ध आणखी चिघळणार आहे.

दुसऱ्या राज्यांतील माझ्या प्रिय भगिनी आणि बांधवांनो, तुम्ही कधी विचार तरी केला आहे का की, हिंदीने किती भाषा गिळंकृत केल्या, असा सवाल करतानाच ‘भोजपुरी’, ‘मैथिली’, ‘अवधी’, ‘ब्रज’, ‘बुंदेली’, ‘गढवाली’, ‘कुमाऊंनी’, ‘मगधी’, ‘मारवाडी’, ‘मालवी’, ‘छत्तीसगढी’, ‘संथाली’, ‘अंगिका’, ‘हो’, ‘खरिया’, ‘खोरठा’, ‘कुरमाली’, ‘कुरुथ’, ‘मुंडारी’ व अशा अनेक भाषा  तग धरण्यासाठी संघर्ष करत आहेत, असे स्टॅलिन म्हणाले.

हिंदी लादण्याचा कडाडून विरोध सुरूच राहील. कारण हिंदी एक मुखवटा आणि संस्कृती लपवणारा चेहरा आहे. द्रविड नेते आणि माजी मुख्यमंत्री अण्णादुरई यांनी दशकांपूर्वी द्विभाषिक धोरण लागू करण्यात आले होते. त्याचा उद्देशच तामिळींवर हिंदी आणि संस्कृत या भाषा असलेल्या आर्य संस्कृतीला लादता कामा नये, असे म्हटले आहे.

Comments are closed.