मध्य वैतरणा तलावात विद्युत, सौरऊर्जा प्रकल्प; 90 हेक्टर राखीव वनजमिनीच्या देवाणघेवाणीला राज्य शासनाची परवानगी

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयावर 20 मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत तर 80 मेगावॅट क्षमतेचा तरंगता सौरऊर्जा असा एकूण 100 मेगावॉट क्षमतेचा संकरित वीजनिर्मिती प्रकल्प विकसित करण्यासाठी राज्य सरकारने 4.90 हेक्टर राखीव वनजमीन देवाणघेवाणीस परवानगी दिली आहे. यामुळे आता संकरित वीजनिर्मिती प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामास सुरूवात केली जाणार आहे. संकरित ऊर्जानिर्मिती क्षेत्रात पाऊल टाकणारी मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिलीच पालिका ठरली आहे.
पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून पालिका प्रशासनाने ही परवानगी प्राप्त केली आहे. या प्रकल्पातून दरवर्षी सुमारे 208 दशलक्ष युनिट ऊर्जानिर्मिती होणार आहे. या प्रकल्पाबरोबरच भविष्यात पालिकेच्या अन्य जलाशयांवर सौरऊर्जा प्रकल्प विकसित करणे शक्य होईल. त्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. पालिकेने पालघर जिह्यात मोखाडा तालुक्यातील कोचाळे गावात
102.4 मीटर उंचीचे आणि 565 मीटर लांबीचे मध्य वैतरणा धरण बांधून सन 2014 मध्ये पूर्ण केले आहे.
दरवर्षी 12 कोटी 6 लाखांची वीजबिल बचत
या प्रकल्पाचे ठळक वैशिष्टय़ म्हणजे प्रकल्पासाठी महानगरपालिकेकडून कोणतीही भांडवली गुंतवणूक केली जाणार नाही. यामुळे पिसे-पांजरापूर स्थित महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण संपुल येथील वीज खर्चात दरवर्षी अंदाजे 12 कोटी 6 लाख रुपयांची बचत होण्याचा अंदाज आहे.
Comments are closed.