बांगलादेशातील हिंसेचे पडसाद थेट लंडनमध्ये, खालिस्तानी गट आणि आंदोलक आमनेसामने

विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादीच्या मृत्यूनंतर बांगलादेशात एका हिंदू तरुणाला जिवंत जाळले. दीपू चंद्र दास असे त्याचे नाव असून त्याची हत्या आता जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरली आहे. या हत्याकांडाच्या निषेधार्थ लंडनमधील बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर हिंदू समुदायाने मोठे आंदोलन केले. बांगलादेशात हिंदूवर होणारे हल्ले थांबवावेत आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली. मात्र, या शांततापूर्ण आंदोलनादरम्यान खलिस्तानी समर्थक गटाने घटनास्थळी गोंधळ घातला. बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या समर्थनार्थ हे खलिस्थानी घटनास्थळी पोहोचले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, खलिस्तानी समर्थक मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश सरकारची पाठराखण करण्यासाठी ढाल बनून उभे होते. यावेळी त्यांनी तेथील आंदोलक हिंदूंना धमकवण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजीही केली. हिंदूंच्या आंदोलनाला विरोध करण्यासाठी खलिस्तानी गटाने घेतलेली ही भूमिका पाहून तेथील नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी लंडन पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत दोन्ही गटांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

खलिस्तानी दहशतवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ चा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू सातत्याने हिंदुस्थानविरोधी कारवाया करत आहे. पन्नूने अलीकडेच अमेरिकेतून एक व्हिडिओ जारी करून बांगलादेशातील कट्टरपंथीयांना पाठिंबा दर्शवला होता. यावरून कट्टरपंथी आणि खलिस्तानी हिंदुस्थानच्या विरोधात एकत्र येत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. ज्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पन्नूने आता हिंदुस्थानच्या ईशान्येकडील राज्यांना तोडण्याचे नवे षडयंत्र रचले आहे. दरम्यान त्याने एक नकाशा शेअर केला असून त्यात आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा आणि नागालँड या राज्यांना मिळून एक स्वतंत्र देश बनवण्याचा दावा केला आहे. या काल्पनिक देशाला त्याने ‘ट्रम्पलँड’ असे नाव दिले असून, अरुणाचल प्रदेशला चीनचा भाग दाखवण्याची हिंमतही केली आहे.

हिंदुस्थानातही बांगलादेशातील अत्याचारांविरोधात अनेक ठिकाणी आंदोलन झाले. पश्चिम बंगाल, आसामसह विविध राज्यांत नागरिक रस्त्यावर उतरले.

बांगलादेशात हिंसाचाराचा भडका, राजधानी ढाक्यात अराजकाची स्थिती

Comments are closed.