Hingoli News – डोंगरकडा शिवारात भरधाव बसची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

कळमनुरी तालुक्यात भरधाव एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. वारंगाफाटा ते नांदेड मार्गावर डोंगरकडा शिवारात मंगळवारी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस विद्युत खांबाला धडकली. सुदैवाने विज पुरवठा खंडीत असल्यामुळे गंभीर प्रसंग टळला आहे.

नांदेड आगाराची बस हदगाव ते नांदेड आज मंगळवारी पावणे सहा वाजताच्या सुमारास सुमारास डोंगरकडा शिवारात आली होती. यावेळी विरुद्ध बाजूने येणार्‍या दुचाकीला बसची जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील व्यक्ती गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

शिवाजी वाघमोडे असे मयत दुचाकीस्वाराचे नाव असून तो वरुड येथील एका आश्रमशाळेवर काम करीत होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली. आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, जमादार संतोष नागरगोजे, विठ्ठल जाधव यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Comments are closed.