टी-20 वर्ल्ड कप वादात बांगलादेशला मोठा धक्का! BCB च्या हट्टीपणामुळे खेळाडू रस्त्यावर येणार

टी-20 वर्ल्ड कपचा वाद आता गंभीर वळण घेऊ लागला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या (BCB) हट्टीपणामुळे आता बांगलादेशी क्रिकेटपटूंना मोठे नुकसान सोसावे लागणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतातील प्रसिद्ध क्रिकेट साहित्य बनवणारी कंपनी ‘एसजी’ (SG), अनेक मुख्य बांगलादेशी खेळाडूंसोबतचे आपले करार (Contracts) संपवणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील वाढत्या तणावामुळे ‘SG’ कंपनीने लिटन दाससह अनेक खेळाडूंसोबतचे करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशसाठी हा दुसरा मोठा धक्का आहे, कारण दुसरी भारतीय स्पोर्ट्स कंपनी ‘सरीन स्पोर्ट्स’ने देखील बांगलादेशमध्ये आपल्या उत्पादनांचे वितरण न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बांगलादेशी खेळाडूंना आर्थिकदृष्ट्या मोठा फटका बसणार आहे.

काही तासांतच बांगलादेश क्रिकेट बोर्डाला मिळालेला हा दुसरा मोठा धक्का आहे. ICC ने बांगलादेशला स्पष्ट बजावले आहे की, त्यांना त्यांचे टी-20 वर्ल्ड कपचे सामने भारतातच खेळावे लागतील. जर बांगलादेशला हे मान्य असेल, तर त्यांनी 21 जानेवारीपर्यंत आपला अंतिम निर्णय कळवावा, अन्यथा त्यांच्या जागी स्कॉटलंडला वर्ल्ड कपमध्ये प्रवेश दिला जाईल. जर बांगलादेश बाहेर पडला, तर रँकिंगच्या आधारावर स्कॉटलंडला संधी मिळेल.

टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या वेळापत्रकानुसार, बांगलादेश ‘ग्रुप सी’ मध्ये आहे. त्यांचा पहिला सामना 7 फेब्रुवारीला वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहे. सध्याच्या नियोजनानुसार, बांगलादेशचे सामने मुंबई आणि कोलकाता येथे होणार आहेत. बीसीबीने यापूर्वी आपली टीम भारतात पाठवण्यास नकार दिला होता, मात्र आयसीसीने ही मागणी फेटाळून लावली आहे.

Comments are closed.