फिफा वर्ल्ड कपमध्ये इराणचा ऐतिहासिक पराक्रम! अमेरिकेच्या भूमीवर मोडीत काढला 60 वर्षांपूर्वीचा विक्रम

फिफा वर्ल्ड कप 2026 (Fifa world Cup 2026) मध्ये सोमवारी (22 जून) इराण आणि बेल्जियम यांच्यात सामना खेळला गेला. हा सामना अनिर्णित (ड्रॉ) राहिला असला, तरी इराणने अमेरिकेच्या भूमीवर एक ऐतिहासिक कामगिरी करत 60 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. लॉस एंजिल्स स्टेडियममध्ये खेळला गेलेला हा ‘ग्रुप-जी’ मधील सामना होता.

इराणचा संघ मैदानात उतरताच त्यांनी 60 वर्षांपूर्वीचा विक्रम आपल्या नावे केला. फिफा वर्ल्ड कपच्या इतिहासातील ‘सर्वात अनुभवी’ (सर्वात जास्त वयाचा) संघ म्हणून इराणची नोंद झाली आहे. त्यांच्या सुरुवातीच्या 11 खेळाडूंच्या संघाचे सरासरी वय 32 वर्षे आणि 181 दिवस होते. 1966 नंतर फिफा वर्ल्ड कपच्या मैदानात उतरलेला हा सर्वात वयस्कर संघ ठरला आहे.

इराणी खेळाडूंनी सामन्यात आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर केला. त्यांनी बेल्जियमसारख्या बलाढ्य संघाला पूर्ण वेळ गोल करण्यापासून रोखून धरले. बेल्जियमने गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण इराणच्या बचावफळीसमोर त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.

सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये इराणच्या मेहदी तारेमीने फ्री-किकवर गोल केला होता. या गोलनंतर इराणी खेळाडूंचा आनंद गगनात मावेनासा झाला होता, पण ही आनंदोत्सव क्षणभंगुर ठरला. ‘व्हिडिओ असिस्टंट रेफरी’ (VAR) द्वारे तपासणी केली असता, तारेमी थोड्या फरकाने ऑफसाइड असल्याचे आढळले आणि तो गोल रद्द करण्यात आला.

बेल्जियमने गोल करण्यासाठी एकूण 23 शॉट्स मारले, परंतु इराणचा गोलकीपर बेइरानवंद बेल्जियमच्या मार्गात भिंतीसारखा उभा राहिला. सामन्याच्या दुसऱ्या हाफमध्ये 66 व्या मिनिटाला बेल्जियमच्या अडचणीत आणखी भर पडली, जेव्हा त्यांच्या एका खेळाडूला ‘रेड कार्ड’ दाखवण्यात आले. इराणचा मेहदी तारेमी गोल करण्यासाठी वेगाने पुढे जात असताना बेल्जियमच्या नाथन नगोयने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. या बचावात्मक चुकीसाठी नगोयला रेड कार्ड मिळाले. यानंतर बेल्जियमचे मैदानावर 10 खेळाडूच राहिले. या स्पर्धेमधील हे 8 वे रेड कार्ड होते.

Comments are closed.