IND vs NZ: किंग कोहलीची शतकी खेळी व्यर्थ! टीम इंडियाविरुद्ध भारतात पहिल्यांदाच वनडे मालिका जिंकत न्यूझीलंडने रचला इतिहास
इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने भारताचा (IND vs NZ) 41 धावांनी पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडने नवा इतिहास रचला असून, भारतीय भूमीवर टीम इंडियाला वनडे मालिकेत हरवण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आहे. या सामन्यात किवी संघाने प्रथम फलंदाजी करताना 337 धावांचा डोंगर उभा केला होता. या अवाढव्य लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ 296 धावांवर बाद झाला. भारताकडून विराट कोहलीने 124 धावांची शानदार शतकी खेळी केली, पण ती संघाला विजय मिळवून देण्यासाठी पुरेशी ठरली नाही.
न्यूझीलंडच्या या ऐतिहासिक विजयात डॅरिल मिचेलचा (Daryl Mitchell) वाटा मोलाचा राहिला. त्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या दोन्ही सामन्यांत शतके झळकावली. इंदूरच्या सामन्यात त्याने 137 धावांची खेळी केली, तर ग्लेन फिलिप्सने (Glenn philips) 106 धावांचे योगदान दिले. विशेष म्हणजे, याच न्यूझीलंड संघाने 2024 मध्ये भारताला त्यांच्याच घरात कसोटी मालिकेत ‘क्लीन स्वीप’ दिले होते.
338 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. केवळ 71 धावांवर भारताचे 4 मुख्य फलंदाज बाद झाले होते. अशा कठीण परिस्थितीत विराटने नितीश कुमार रेड्डीसोबत 88 धावांची भागीदारी करून भारताच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. मात्र, इतर अनुभवी फलंदाजांनी निराशा केली. रोहित शर्मा (11), कर्णधार शुबमन गिल (23), श्रेयस अय्यर (3) आणि केएल राहुल (1) स्वस्तात बाद झाले.
Comments are closed.