रंगयात्रा – ओथ ऑफ द होराटी
>>दुष्यंत पाटील
कलेच्या माध्यमातून जनतेच्या मनावर ‘त्याग’ आणि ‘कर्तव्य’ ही मूल्यं बिंबवावीत या विचारातून ऐंशीच्या दशकात राजा लुई (सोळावा) याने चित्रकार जॅकस डेव्हिड याला चित्र काढायला सांगितले. मात्र हे चित्र पाहून लोकांच्या मनात क्रांतीच्या भावना चेतवल्या गेल्या. त्याचं ‘ओथ ऑफ द होराटी’ हे चित्र आजच्या काळालाही तितकंच लागू होतं.
सतराशे ऐंशीच्या दशकात फ्रान्समध्ये क्रांतीचं वातावरण होतं. फ्रान्सची आर्थिक परिस्थिती वाईट होती. जनतेला खायलाही मिळत नव्हतं. लोक बंड करू शकतात, हे त्या काळचा राजा लुई (सोळावा) याला कळलं होतं. म्हणून त्यानं विचार केला की, कलेच्या माध्यमातून जनतेच्या मनावर ‘त्याग’ आणि ‘कर्तव्य’ ही मूल्यं बिंबवता येतील. यासाठी त्यानं चित्रकार जॅकस डेव्हिड याला एक चित्र काढायला सांगितलं. राजाचा असा उद्देश होता की, लोकांनी हे चित्र बघावं आणि स्वतला सांगावं, ‘देश संकटात आहे, आपण राजाला साथ दिली पाहिजे.’
चित्रकार डेव्हिड राजासाठी काम करत असला तरी हृदयानं क्रांतीच्या बाजूनं होता. त्यानं जे काही चित्र काढलं ते पाहून लोकांच्या मनात क्रांतीच्या भावना चेतवल्या गेल्या. त्यानं ‘ओथ ऑफ द होराटी’ नावाचं चित्र काढलं. या चित्रात त्यानं प्राचीन रोममधला एक प्रसंग दाखवलाय.
प्राचीन काळी रोम आणि त्याच्या शेजारी असणारं अल्बा लोंगा या दोन शहरांमध्ये कडाक्याचं भांडण व्हायचं. हे दोन्ही शेजारी. पण सतत युद्ध. या युद्धानं दोन्हीकडचे सैनिक मरायचे, सामान्य लोकांचं प्रचंड नुकसान व्हायचं. मग दोन्हीकडच्या समजूतदार लोकांनी ठरवलं की अशा विनाशकारी युद्धापेक्षा काहीतरी कमी नुकसानाचा मार्ग निवडायला हवा. मग त्यांनी असं ठरवलं की, रोमचे तीन योद्धे आणि अल्बा लोंगाचे तीन योद्धे एकमेकांशी लढतील. जो गट जिंकेल, त्याचं शहर जिंकलं. बाकीच्या सैन्याला लढायची गरज नाही.
तीन योद्धे म्हणून रोमनं होराटी कुटुंबातले तीन सख्खे भाऊ निवडले. तर अल्बा लोंगानं क्युराटी कुटुंबातले 3 सख्खे भाऊ निवडले. पण इथेच खरी मेख आहे. हे नुसतं युद्ध नव्हतं, तर हा एक ‘फॅमिली ड्रामा’ होता. होराटी भावांच्या एक बहिणीचा (कॅमिला) अल्बा लोंगाच्या एका क्युराटी भावाशी साखरपुडा झालेली होता. आणि क्युराटी भावांची एक बहीण (सबिना) होराटी भावांच्या घरात सून म्हणून आलेली होती! म्हणजे कुणाचाही विजय झाला तरी होराटी कुटुंबाचं (आणि क्युराटी कुटुंबाचंही) नुकसानच होणार होतं. होराटी बंधू जिंकले तर क्युराटी बंधूंचा अंत करून त्यांना आपल्या बहिणीला विधवा करावं लागणार होतं! याउलट होराटी बंधू हरून त्यांचा मृत्यू झाला तरीही त्यांच्या घरात शोककळा अटळच होती.
डेव्हिडनं चित्रामध्ये होराटी कुटुंबातलं युद्धाआधीचं दृश्य दाखवलंय. चित्रात होराटी बंधूंना त्यांचे वडील लढण्यासाठी तलवारी देताहेत तर होराटी बंधू रोमसाठी लढण्याची शपथ घेत आहेत. डेव्हिडनं या चित्रामध्ये स्पष्टपणे तीन भाग दाखवलेत. चित्राच्या तीन भागांच्या पार्श्वभूमीला तीन कमानी आहेत.
चित्राच्या डाव्या भागात तीन भाऊ दिसतात. त्यांची देहबोलीच त्यांची लढाऊ वृत्ती, कर्तव्यनिष्ठा दाखवते. डेव्हिडनं त्यांचे हातपाय एकदम ताठ दाखवलेत. ते तिघेही एका रेषेत, एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत. कर्तव्यापुढे भावनेला जागा नाही, असा स्पष्ट संदेश चित्रकारानं या पहिल्या भागातून दिलाय.
मधल्या कमानीत होराटींचे वडील उभे आहेत. हे वडील म्हणजे साक्षात ‘देशभक्ती’ आहेत. त्यांचं चित्र सांगतंय, ‘माझं बाप असणं नंतर, आधी मी या रोमचा नागरिक आहे.’ त्यांच्या हातात तीन तलवारी आहेत. ते त्या तलवारी मुलांकडे देताहेत आणि त्यांच्याकडून शपथ घेताहेत. त्यांना दुःख नाहीये का? नक्कीच असणार. आपली तिन्ही पोरं मरू शकतात हे त्यांना ठाऊक आहे. पण त्यांच्याकडे भावनांना स्थान नाही. त्यांनी लाल रंगांचं वस्त्र परिधान केलंय. हा रंग क्रांतीचा आणि रक्ताचा आहे. हा रंग चित्रामध्ये उठून दिसतोय.
आता चित्रातला उजवीकडचा भाग पाहूया. डावीकडे पुरुष ताठ आहेत, तर उजवीकडे बायका कोलमडलेल्या अवस्थेत आहेत. त्यांना माहीत आहे की, आज कुणाचा तरी मृत्यू निश्चित आहे. मग तो भावाचा असो किंवा नवऱ्याचा. चित्रातला हा भाग ‘कौटुंबिक प्रेम आणि दुःख’ दाखवतो.
या चित्रावर लोकांची प्रतिक्रिया कशी होती? लोकांनी जेव्हा हे चित्र बघितलं, तेव्हा त्यांना राजा नाही, तर ‘कर्तव्य’ दिसलं. त्यांना वाटलं की, आपलं कर्तव्य राजाची चाकरी करणं नाहीये, तर देशाचं रक्षण करणं आहे. आणि जर राजा देशाचं नुकसान करत असेल, तर त्याला हटवणं हेच आपलं कर्तव्य आहे. म्हणजेच, राजानं जे शस्त्र स्वतच्या संरक्षणासाठी बनवून घेतलं होतं, तेच त्याच्या उलटं फिरलं !
Comments are closed.