इतिहास पुन्हा घडू शकतो; भारत-वेस्ट इंडिज सामन्यापूर्वी डॅरेन सॅमीचा इशारा

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सुपर-८ सामन्यापूर्वी डॅरेन सॅमीने भारतीय संघाच्या जुन्या जखमा पुन्हा नव्याने भरल्या आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा सामना दोन्ही संघांसाठी ‘करो या मरो’ असा सामना असेल. आजच्या सामन्यातील विजेता थेट उपांत्य फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत संघ स्पर्धेतून बाहेर पडेल. यामुळे संपूर्ण क्रिकेट जगताचे या सामन्याकडे लक्ष आहे.

२०१२ आणि २०१६ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज संघाचा माजी कर्णधार सॅमीने २०१६ च्या आठवणी ताज्या केल्या. आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजने भारताला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर, अंतिम फेरीत इंग्लंडला हरवून त्यांनी दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले.

सॅमी म्हणाला, “एक म्हण आहे की इतिहासाची पुनरावृत्ती होते, जरी मैदान वेगळे असले तरी. पण हे दोन वेगवेगळे संघ आहेत आणि दोघेही स्पर्धेत पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. जर आपल्याला ही स्पर्धा जिंकायची असेल, तर आपल्याला कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर भारताला हरवावे लागेल. आपल्यासाठी तो क्षण आला आहे.”

या सामन्याच्या महत्त्वाबद्दल बोलताना सॅमीने प्रेक्षकांचाही उल्लेख केला. “उद्या स्टेडियममध्ये सुमारे ८० हजार प्रेक्षक असतील आणि सुमारे १.४ अब्ज भारतीय चाहते त्यांच्या संघाला पाठिंबा देतील. त्यामुळे हा सामना ‘डेव्हिड विरुद्ध गोलियाथ’ असा वाटू शकतो. पण २०१६ मध्ये डेव्हिडने गोलियाथला हरवले,” असे तो आत्मविश्वासाने म्हणाला.

सॅमीने त्याच्या खेळाडूंना सज्ज राहण्याचा इशाराही दिला. “माझे सर्व सैनिक उद्याच्या लढाईसाठी सज्ज आहेत. अंतिम ११ खेळाडू नाणेफेक दरम्यान निवडले जातील, परंतु आम्ही चांगले क्रिकेट खेळण्यास उत्सुक आहोत,” असे तो म्हणाला.

दरम्यान, या विधानानंतर भारत-वेस्ट इंडिज सामना अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे. भारत जुने आणवणी मिटवण्यासाठी मैदानात उतरणार की वेस्ट इंडिज पुन्हा इतिहास रचणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.