कल्याणमध्ये हिट ॲण्ड रन – भरधाव कारने सायकलस्वाराला चिरडले; अल्पवयीन चालक ताब्यात, श्रीनिवास तांदळेचा दुर्दैवी मृत्यू
‘हिट अॅण्ड रन ‘च्या घटनेने कल्याण हादरले. बुधवारी रात्री गांधारी रिंग रोडवर एका भरधाव कारने सायकलस्वाराला चिरडले. यामध्ये श्रीनिवास तांदळे (३८) यांचा मृत्यू झाला. संतापजनक बाब म्हणजे १७ वर्षीय मुलाने बेदरकारपणे कार चालवून निष्पाप तरुणाचा बळी घेतला. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी कार रेसिंग करणाऱ्या मुलाला ताब्यात घेतले असून कारची मालकी असलेल्या त्याच्या आईविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कल्याणचा गांधारी रिंग रोड बेशिस्त वाहनचालकांमुळे धोकादायक ठरत आहे. बुधवारी रात्री ८ वाजता रेसिंगप्रमाणे भरधाव कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाने श्रीनिवास तांदळे यांना जोरदार धडक दिली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातात मृत्यू झालेल्या श्रीनिवास तांदळे यांना आज सकाळी कल्याण सायकलिस्ट ग्रुप, बाईकपोर्ट सायकलिस्ट ग्रुप, रनर्स ग्रुपसह नागरिकांनी रिंग रोडवर एकत्र येत श्रद्धांजली वाहिली. दरम्यान कोणत्याही पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देऊ नये. अन्यथा संबंधित मुलासह वाहनमालक, आई-वडिलांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे यांनी दिला आहे.
हुल्लडबाजांचे जीवघेणे रेसिंग
मॉर्निंग वॉक, जॉगिंग, सायकलिंग आणि योगासाठी प्रसिद्ध असलेला कल्याण रिंग रोड आता धोकादायक ठरत आहे. गेल्या काही वर्षांत येथे अपघातांची संख्या वाढत असून अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. विशेषतः संध्याकाळनंतर येथे तरुणांची मोठी गर्दी होत असून काही हुल्लडबाज बाईक आणि कार रेसिंगसाठी या रस्त्याचा वापर करतात. वेगाच्या या स्पर्धेमुळे अनेक निष्पापांचा हकनाक जीव जात आहे.
पोलीस करतात का?
कल्याण रिंग रोडसह डोंबिवली आणि कल्याणमधील अनेक रस्ते आणि पुलांवर वाहनचालकांची स्टंटबाजी सुरू असते. रात्री तर या ठिकाणी मद्यपी आणि ड्रग्ज तस्करांचा वावर असतो. मात्र रात्रीच्या वेळी पोलिसांचे पेट्रोलिंग होत नसल्याने हुल्लडबाजांच्या भरधाव वेगाची धास्ती सायकल स्वार, पादचाऱ्यांना असते. वारंवार अपघात घडूनही पोलीस लक्ष देत नसल्याने नागरिकांची नाराजी आहे. नशेखोरांच्या भरधाव वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोल ीस आणि शहर पोलिसांनी खबरदारी घेऊन तातडीने उपाययोजना राबवण्याची गरज व्यक्त होत आहे.
Comments are closed.