हिटमॅन 2.0… रोहित शर्माची फटकेबाजी पाहून अनिल कुंबळेने केली मोठी घोषणा, म्हणाले…
भारतीय संघाचा माजी कर्णधार अनिल कुंबळे आयपीएलच्या या हंगामातील पहिल्याच सामन्यातील रोहित शर्माच्या कामगिरीने प्रचंड प्रभावित झाला आहे. रोहितचा हा 'अवतार 2.0' संपूर्ण स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघांसाठी चिंतेचा विषय ठरेल, असे कुंबळेचे मानणे आहे. ३८ वर्षीय रोहितने ३८ चेंडूत ७८ धावांची खेळी केली, ज्याच्या जोरावर मुंबई इंडियन्सने रविवारी आयपीएलच्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सहा गडी राखून पराभव केला.
कुंबळेने ‘स्टार स्पोर्ट्स’शी बोलताना सांगितले की, “असे वाटते की रोहित शर्मा आता त्याच्या २.० अवतारात परतला आहे. त्याच्या या खेळीने हे सिद्ध केले आहे की तो पुन्हा एकदा मैदानात आपले वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. तो ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता, त्यावरून मला त्याच्या कारकिर्दीतील सुवर्णकाळाची आठवण झाली.”
तो पुढे म्हणाला की, “वरूण चक्रवर्ती, सुनील नारायण आणि ब्लेसिंग मुझरबानी सारख्या गोलंदाजांना षटकार मारणे सोपे काम नाही, पण रोहितने ते अगदी सहज करून दाखवले. त्याने आपल्या फिटनेसवर खूप मेहनत घेतली आहे. विश्रांतीनंतर परतल्यावर पुन्हा आपली लय आणि टायमिंग मिळवण्यासाठी साधारण पाच ते सात दिवस लागतात, पण रोहितने ते लवकर साध्य केले आहे.”
कुंबळे पुढे म्हणाला, “ती एक विलक्षण खेळी होती, षटकार अगदी सहज मारले जात होते. या खेळीने हे दाखवून दिले आहे की रोहितचा हा नवा अवतार आयपीएलमधील इतर संघांसाठी धोक्याची घंटा ठरेल.”
मुंबईच्या कामगिरीचे कौतुक करताना कुंबळेने कोलकाताच्या धोरणात्मक चुकांकडेही लक्ष वेधले. त्याच्या मते, केकेआरने नरेन आणि चक्रवर्ती या फिरकी जोडीवर खूप जास्त अवलंबून राहणे पसंत केले, पण त्यांचा योग्य पद्धतीने वापर करता आला नाही. विशेषतः, जेव्हा रोहित आणि त्याचा सलामीचा जोडीदार जोरदार आक्रमण करत होते, तेव्हा पॉवर प्ले दरम्यान नरेनला गोलंदाजीसाठी का बोलावले गेले नाही, असा सवालही त्याने उपस्थित केला.
Comments are closed.