Hockey World Cup 2026 – एका ‘गोल’ने स्वप्न भंगलं… ऑस्ट्रेलियाच्या अभेद्य तटबंदीमुळे हिंदुस्थानचा महिला संघ वर्ल्डकपमधून बाहेर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

फोटो – हॉकी इंडिया

महिला हॉकी वर्ल्डकपमधून हिंदुस्थानचे आव्हान संपुष्टात आले आहे. रविवारी पार पडलेल्या ‘करो या मरो’ सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध गोल शून्य बरोबरीत सुटल्यामुळे हिंदुस्थानला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. ‘पूल ई’मधून नेदरलँड आणि ऑस्ट्रेलियाने सेमीफायनल गाठली.

सेमीफायनल गाठण्यासाठी हिंदुस्थानला हा सामना जिंकणे अनिवार्य होते. मात्र ऑस्ट्रेलियाची अभेद्य तटबंदी भेदण्यात हिंदुस्थानला अपयश आले आणि सामना 0-0 असा बरोबरीत सुटला. हिंदुस्थान, ऑस्ट्रेलिया आणि चीन या तिन्ही संघांचे प्रत्येकी दोन गुण झाले, मात्र एका गोलच्या फरकाने हिंदुस्थानला सेमीफायनल गाठण्यात अपयश आले.

सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला ऑस्ट्रेलियाने गोल डागला होता. मैदानातील पंचांनी तो गोल मान्य केला होता, परंतु हिंदुस्थानने ‘रेफरल’ घेतले आणि त्यानंतर गोल रद्द ठरवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अनेक आक्रमक चाली रचल्या, परंतु हिंदुस्थानची कर्णधार व गोलरक्षक सविता पुनिया, बिचू देवी आणि बचावफळीने उत्कृष्ट काम केले. पेनल्टी कॉर्नर रोखताना सलिमा टेटेच्या चपळ ‘फर्स्ट-रशिंग’ने कांगारूंचे मनसुबे उधळून लावले.

दुसऱ्या सत्राच्या अखेरच्या सेकंदांमध्ये पेनल्टी कॉर्नरच्या व्हेरिएशनवर निक्की प्रधान हिना गोल करण्याची सुवर्णसंधी मिळाली होती, पण ती हुकली. त्यानंतर तिसऱ्या सत्रात नवनीत कौर आणि बलजीत कौर यांनी रचलेल्या सुरेख चालीवर दीपिका शेरावत हिना बॉक्समध्ये चेंडू मिळाला, मात्र घाईघाईत मारलेला शॉट हुकल्याने हिंदुस्थानने आघाडी घेण्याची दुसरी मोठी संधी गमावली.

चौथ्या आणि शेवटच्या सत्रात गोल करण्यासाठी हिंदुस्थानने गोलरक्षकाला बाहेर काढून अतिरिक्त खेळाडूला मैदानात उतरवले. परंतु, ऑस्ट्रेलियाच्या भक्कम तटबंदीपुढे हिंदुस्थानच्या आक्रमक खेळाडूंची डाळ शिजली नाही. आता हिंदुस्थानचा संघ पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकासाठी खेळेल.

Comments are closed.