होळी रे होळी… महागाई ‘पोळी’

रंग, पाण्याच्या उधळणीबरोबरच पुरणपोळी, भांगेचा बेत आखत मुंबईकर होलिकोत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत. होळीला अर्पण करण्याकरिता नारळ, बत्ताशे, लाह्या, साखरेच्या माळा खरेदीकरिता बुधवारी सायंकाळी बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी झाली होती. होळीकरिता पुरणपोळीला चांगलाच भाव येतो. यंदा पुरणपोळीच्या किमती पाच ते सात रुपयांनी वाढल्या असल्या तरी मागणी कायम आहे.

मुंबईत अनेक वाडय़ा, चाळींच्या जागी हाऊसिंग सोसायटय़ा उभ्या राहिल्या असल्या तरी अमंगल विचारांचा नायनाट करून सकारात्मक ऊर्जा चेतवणाऱया होळी या पारंपरिक सणाला मुंबईकर विसरलेले नाहीत. मुंबईच्या कोळीवाडय़ांमध्ये तर गेले आठवडाभर होळीचा माहोल आहे. विविध रंगांनी बाजारपेठ फुलल्या असून इकोफ्रेंडली रंग चांगलाच भाव खाऊन जात आहे. कार्टुनची छबी असलेल्या पिचकाऱ्यांना बच्चेपंपनींकडून मागणी आहे.

Comments are closed.