आई आणि बायकोच्या नावाने डान्सबार काढून मुली नाचवता, लाज नाही वाटत? गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी राजीनामा द्यावा, अनिल परब यांची मागणी

आई आणि बायकोच्या नावाने डान्सबार काढून मुली नाचवता, लाज नाही वाटत? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार अनिल परब यांनी विचारला. तसेच या प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही अनिल परब यांनी केली.

मिंधे गटाचे नेते, आमदार आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने डान्सबार चालवला जातो. त्यात बारबाला नाचवल्या जातात, अश्लील नृत्य करून पैसे उडवले जातात, ही सर्व माहिती पोलीसांनी नोंदवली आहे अशी माहिती अनिल परब यांनी दिली. तसेच ही माहिती खोटी अशू शकत नाही. पोलिसांनी कदम यांच्या मालकीच्या सावली बारवर धाड घातली, तेव्हा तिथून 22 बारबाला आणि 22 गिऱ्हाईकांसह चार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली, हे मी सगळे पुराव्यानिशीह विधानसभेत सांगितले असेही अनिल परब म्हणाले. आई आणि बायकोच्या नावाने डान्सबार काढून मुली नाचवता लाज नाही वाटत असे अनिल परब म्हणाले.

सावली बार हा आम्ही चालवायला दिला होता असा बचाव रामदास कदम यांनी केला होता. पण ज्याच्याकडे हा बार चालवायला दिला असेल आणि त्याने काही चूक केली तर त्यासाठी परवानाधारकही तितकाच जबाबदार असतो असेही अनिल परब म्हणाले. सावली बारमध्ये बारबाला नाचवल्या जातात, अश्लीलता चालते, सावली बारवर यापूर्वी दोनवेळा कारवाई झाली आहे यासाठी कदम जबाबदार असल्याचे अनिल परब यांनी सांगितले.

मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जन्मदिन आहे. त्यानमित्ताने त्यांच्या आमदारांचे प्रतार मी त्यांना भेट देणार होतो, पण ते मुंबईत नाही. मुंबईत आल्यावर मी त्यांच्याकडे सगळे पुरावे देईन असे अनिल परब म्हणाले. हा बार चालवतानाही मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा अनिल परब यांनी केला. ऑर्केस्ट्रामध्ये पाच मुलींची परवानगी असते पण सावली बारमध्ये 14 मुली होत्या. तसेच या डान्स करताना या मुली ग्राहकांशी लगट करत होत्या हे पोलीस रेकॉर्डमध्ये नोंदवलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करावी आणि योगेश कदम यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी अनिल परब यांनी केली आहे.

Comments are closed.