सन्मान निधी [distributed] पंतप्रधान मोदी यांनी

दिवाळीआधी शेतकऱ्यांना भेट, गुजरातमध्ये अनेक प्रकल्पांचे उद्घाटन, 14 हजार कोटींची गुंतवणूक

वृत्तसंस्था/ गांधीनगर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘किसान सम्मान निधी’च्या हप्त्यांचे वितरण केले आहे. वितरीत करण्यात आलेली रक्कम 19 हजार कोटी रुपयांची आहे. शुक्रवारी गुजरातमध्ये त्यांनी ही रक्कम ऑन लाईन वितरीत केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी गुजरातसाठी 14 हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुक्रवारी सकाळी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यासाठी या राज्याची राजधानी गांधीनगर येथे आगमन झाले. त्यानंतर त्यांनी विविध कार्यक्रमात भाग घेतला. भिलडी येथे त्यांनी भारत बोव्हीन ब्रीडींग अँड रीसर्च (बीबीबीआरसी) केंद्राचे उद्घाटन केले. 127 एकरमध्ये विस्तारलेल्या या प्रकल्पात वासरांची पैदास, त्यांची जनुकीय सुधारणा आणि दुभत्या प्राण्यांच्या पुनरुत्पादनावर संशोधन केले जाणार आहे. नंतर त्यांनी बनास दुग्धालय जैव इंधन वायू निर्मितीच्या दोन केंद्राची कोनशीला स्थापन केली. या केंद्रांमधून प्रतिदिन अनुक्रमे 75 आणि 100 टन जैव इंधन वायूचे उत्पादन होणार आहे. नंतर त्यांनी अहमदाबाद मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या विस्तार प्रकल्पाचीही कोनशीला स्थापन केली. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ही मेट्रो अहमदाबाचा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि गिफ्ट शहरापर्यंत पोहचणार आहे. नंतर त्यांनी अहमदाबाद (साबरमती)-वाराणसी एक्स्पे्रस आणि मेहसाणा-बेचारजी-साबरमती अशा एमईएमयु सेवेचाही शुभारंभ केला. त्यांनी गुजरात राज्यात निर्माण होणार असलेल्या 4 हजार 30 अंगणवाडी आणि बालसंगोपन केंद्रांच्याही कोनशीलांची स्थापना केली. या प्रकल्पासाठी 800 कोटी रुपयांचा खर्च येणार असून 4 लाख लोकांना लाभ होणार आहे. त्यांनी 521 कोटी रुपये खर्च करुन निर्माण करण्यात आलेल्या अनेक कृषी प्रकल्पांचेही राष्ट्रार्पण केले. या प्रकल्पांमध्ये 12 फलोत्पादन प्रकल्पांचाही समावेश आहे. या फलोत्पादन संकुलांसाठी 1 लाख 46 हजार हेक्टर भूमी उपलब्ध करुन देण्यात आली असून या संकुलांचा लाभ 1.3 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. उत्तर गुजरातमधील दोन बटाटा उत्पादन संकुलांचाही या प्रकल्पांमध्ये समावेश आहे.

‘भारत पर्व’ चे उद्घाटन

संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकता नगर येथे ‘भारत पर्व-2026’ चे उद्घाटन करण्यात आले. नंतर त्यांनी ‘एकता प्रकाश पर्वा’ कार्यक्रमामध्येही भाग घेतला. हा कार्यक्रम दीड कोटी एलईडी दिव्यांच्या साहाय्याने आयोजित करण्यात आला आहे. या नंतर त्यांनी ‘नर्मदा आरती’ या कार्यक्रमातही भाग घेतला. अशा प्रकारे शुक्रवारचा संपूर्ण दिवस गुजरातसाठी महत्वाचा ठरला.

आज एकता पुतळ्यानजीक कार्यक्रम

आज शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अतिभव्य पुतळ्याला पुष्पमाल्यार्पण करुन अभिवादन करणार आहेत. एकता नगर येथे ते 400 कोटी रुपये गुंतवणुकीच्या प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. या प्रकल्पांमध्ये आयआरसीटीसी हॉटेल आणि नर्मदा घाट सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांचा समावेश आहे. हे प्रकल्प भविष्याचा विचार करुन आयोजिलेले आहेत.

सकाळी अनेक प्रकल्पांच्या उद्घाटनांच्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित विशाल जनसमुदायाला उद्देशून भाषण केले. बनासकाठा या जिल्ह्याने गेल्या 10 वर्षांमध्ये कृषीक्षेत्र, दुग्धोत्पादन क्षेत्र, पायाभूत सुविधा निर्मिती क्षेत्र आणि कनेक्टिव्हिटी क्षेत्र या आर्थिकदृष्ट्या महत्वाच्या क्षेत्रांमध्ये किती वेगाने प्रगती केली आहे, याची माहिती त्यांनी त्यांच्या भाषणात दिली. या जिल्ह्याचा विकास अत्यंत वेगवान पद्धतीने होत असून येथे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. या प्रगतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. या जिल्ह्यातील गरीबी दूर होण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे, असे महत्वाचे प्रतिपादन त्यांनी केले.

भरगच्च कार्यक्रम

ड दोन दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुजरातमध्ये मोठे आर्थिक कार्यक्रम

ड बनासकाठा जिल्ह्यांच्या आर्थिक प्रगतीत शेतकऱ्यांचे योगदान अविस्मरणीय

ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प कोनशीला

ड या प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार, जनतेची सोयही

 

 

Comments are closed.