बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना; पबला लागलेल्या आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी
थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये रविवारी मध्यरात्री एका पबमध्ये भीषण आग लागली. या आगीमध्ये 27 जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. सुमारे अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीमुळे पबच्या आतील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून टेबल, खुर्च्या आणि इतर साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून या आगीचे भीषण स्वरूप लक्षात येते. पबच्या प्रवेशद्वारातून आगीच्या ज्वाळांमधून बाहेर पडताना आणि जीव वाचवण्यासाठी लोकांची धावपळ सुरू असल्याचे दिसून येते. आजूबाजूला सर्व ठिकाणी काळाकुट्ट धूर झाल्याने, परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. असे वृत्त TV 9 ने दिले आहे.
थायलंडच्या पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला. “या दुर्घटनेत 27 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेक जखमींवर उपचार सुरू आहेत असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्याचबरोबर आगीचे कारण शोधण्यासाठी सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशीही माहिती त्यांनी यावेळी माध्यमांना दिली. या दुर्घटनेनंतर संबंधित पबमधील अग्निसुरक्षा व्यवस्था आणि सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले होते का, याचाही तपास प्रशासनाकडून केला जात आहे.
Comments are closed.