लातूरमधील गुडसूर येथे मध्यरात्री घरफोडी; 3.66 लाखांचा मुद्देमाल लंपास
लातूरमधील गुडसुर येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करून तब्बल 3 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलीस ठाणे वाढवणा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार राजकुमार रामचंद्र लखनगावे (वय 32 वर्षे, व्यवसाय शेती, रा. गुडसूर ता. उदगीर जि. लातूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून २० फेब्रुवारी रात्री ११.३० ते २१ फेब्रुवारी पहाटे ५.३० या दरम्यान ही घटना घडली. तक्रारदार जेवण करून झोपले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कडी-कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटाचे लॉक तोडून आत ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली.
चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये सुमारे ७९ ग्रॅम (७ तोळे ९ ग्रॅम) वजनाचे विविध प्रकारचे सोन्याचे दागिने गंठन, अंगठ्या, झुमके, नेकलेस, लॉकेट यांची अंदाजे किंमत ३ लाख १६ हजार रुपये असून, त्यासोबत ५० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ३ लाख ६६ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. या प्रकरणी (BNS) कलम ३३१ (४), ३०५ (A) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक ४०/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. पी. गायकवाड यांच्या मार्गद-र्शनाखाली सुरू आहे. ग्रामीण भागात वाढत असलेल्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Comments are closed.