अवकाळीच्या तडाख्याने शहापुरात घरे कोसळली, शाळेचे पत्रे उडाले, अन्नधान्य भिजून गेले

गेले दोन दिवस विजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह कोसळलेल्या तुफानी अवकाळी पावसाने शहापूर तालुक्यात अक्षरशः दाणादाण उडवली. तालुक्यातील कसारा परिसरातील कळभोडे, लादीची वाडी आणि अनेक गावात अस्मानी संकटाने होत्याचे नव्हते केले. पावसाच्या जोरदार हल्ल्यात अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले, अनेक भिंती कोसळल्या, छपरे उडाली. त्यामुळे घरात कणकण साठवून ठेवलेले अन्नधान्य भिजून गेले. कपड्यांचा चिखल झाला. गावातील जिल्हा परिषदेची शाळाही एका क्षणात होत्याची नव्हती झाली. भिंत पडली, चूल विझली.. सारे काही गेले.. कुसुमाग्रजांच्या ‘कणा’ कवितेसारखीच या आदिवासींची अवस्था झाली असून त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत.

बुधवार सकाळपासून अवकाळी पावसाने शहापूर तालुक्याला झोडपून काढले. आजही तीच परिस्थिती होती. सर्वाधिक फटका हा कसारा परिसरातील अनेक गावांना आणि पाड्यांना बसला. कळघोडे आणि लादीची वाडी गावाची तर अवकाळीने दाणादाण उडवली. विठ्ठल तेलम, जैतू भगत, संजय शीद, सोमा शीद, बुवा वाक, कान्हू सोगाळ, अवन खडके, संतोष हंबीर, हरी खडके, अर्जुन सोंगाळ, हरी सोंगाळ, तुका झांजे, कमल झांजे, गंगू आगीवले, हिरू आगीवले, सोमनाथ पवार यांच्या घराच्या भिंतींना तडे गेले, कौले फुटली, छप्परच हिरावले गेले. गंगूबाई या त्यांच्या पाच कुटुंब सदस्यांसह ताडपत्री घातलेल्या कुडाच्या झोपडीत राहत होत्या, परंतु त्यांच्या डोक्यावरील छप्पर उडून गेले, झोपडी वाकली. पावसाच्या प्रचंड माऱ्याने घरातील साठवलेले अन्नधान्य भिजून गेले. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. गावातील कुटुंबे अक्षरशः रस्त्यावर आली आहेत.

जिल्हा परिषदेच्या शाळेचे खंडहर झाले
या गावातील जिल्हा परिषद शाळेचीही अवकाळीने दुरवस्था केली. शाळेचे सगळे छप्परच उडून गेले. भिंतींना मोठाले तडे गेले. शाळेतील शैक्षणिक साहित्य, रजिस्टर भिजून गेले. त्यामुळे या शाळेचे खंडहर झाल्याचे दिसत होते. याची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य नामदेव भला, शिवा भोईर, सोमनाथ वाख व गावातील तरुणांनी धाव घेऊन मदतकार्य केले. कळघोडे गावचे सरपंच जया वाख यांनी तहसीलदारांना याबाबतची खबर दिली.

तीन दिवस ब्लॅकआऊट
अवकाळीच्या तडाख्याने वीज कंपनीचे पोल व केबल तुटल्या. तीन दिवस उलटले तरी या दुर्गम भागात वीज कंपनीचे कर्मचारी पोहोचले नाहीत. पोल व तारा रस्त्यावर अस्ताव्यस्त पडल्या आहेत. त्यामुळे गावात तीन दिवस ब्लॅकआऊट आहे.

अवकाळीचा वसईत पहिला बळी
वसई – अवकाळी पावसाने वसईतील भिक्षेकऱ्याचा बळी घेतला. जीवन सोलंकी हा भिक्षेकरी नालासोपारा पूर्व आचोळे रोड, सुन्नी मस्जिद येथे रोजच्या प्रमाणे भिक्षा मागायला बसला असताना जोरदार वाऱ्यामुळे मशिदीवरून तुटून पडलेला लोखंडी पाइप जीवनच्या डोक्यात पडला. गंभीर जखमी झालेल्या जीवनला रहिवाशांनी विजयनगर येथील पालिका रुग्णालयात दाखल केले, परंतु त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.

Comments are closed.