आयपीएल सारखी क्रिकेट लीग कुणीही सुरू करू शकतो का? जाणून घ्या महत्त्वाचे नियम

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेने (IPL) फक्त भारतातच नाही, तर संपूर्ण जगभरात आपला एक वेगळाच दबदबा निर्माण केला आहे. आयपीएल ही जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीग पैकी एक मानली जाते. पण भारतात कोणी हाच पॅटर्न वापरून दुसरी अशी लीग सुरु करू शकतो का? जर कोणी भारतात फ्रँचायझी टी20 लीग आयोजित करू इच्छित असेल, तर त्याला परवानगी घ्यावी लागते का, की कोणतीही परवानगी न घेता अशी स्पर्धा आयोजित करता येते? या सर्व प्रश्नांची उत्तरे इथे तुम्हाला मिळतील.

आयपीएलच्या मैदानावर भारतातील अनेक राज्यांनी आपापल्या फ्रँचायझी लीग सुरू केल्या आहेत. उदाहरणच घ्यायचं झालं तर, तमिळनाडू प्रीमियर लीग, दिल्ली प्रीमियर लीग किंवा महाराष्ट्र प्रीमियर लीग. भारतात कोणत्याही राज्याच्या किंवा शहराच्या नावाने क्रिकेट लीग सुरु करायची असल्यास, आयोजकांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) परवानगी घ्यावी लागते. तसेच,भारतात बंगाल प्रो टी20 लीग आणि मध्य प्रदेश टी20 लीग हीसुद्धा सुरू झालेल्या आहेत. तसेच 2024 मध्ये पुडुचेरी टी20 लीग सुरु झाली, त्यासाठीही BCCIची परवानगी घेण्यात आली होती.

लीजेंड्स लीगचे नियम वेगळे आहेत का? भारतामध्ये लीजेंड्स लीग क्रिकेटचा देखील चांगलाच क्रेझ वाढला आहे. या लीगमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले खेळाडू सहभागी होतात. कारण निवृत्त खेळाडूंचे BCCIसोबत कोणतेही करार नसतात, त्यामुळे लीजेंड्स लीगचे आयोजन करण्यासाठी BCCIची परवानगी घ्यावी लागत नाही. गेल्या काही काळात अशा काही बातम्या आल्या होत्या की IPL लीजेंड्स लीग सुरु होऊ शकते, पण अद्याप यावर कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. भारतात झालेल्या लीजेंड्स लीगमध्ये युवराज सिंग, इरफान पठाण, सुरेश रैना आणि युसुफ पठाण यांसारखे दिग्गज खेळताना दिसले आहेत.

Comments are closed.