IND vs ENG: लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर किती सामने जिंकला भारत? यंदाही मारणार बाजी?

इंडिया वि इंग्लंड लॉर्ड्स टेस्ट: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांची कसोटी मालिका आता तिसऱ्या सामन्याकडे वाटचाल करत आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकल्यामुळे मालिका 1-1 अशा बरोबरीत आहे. तिसरा सामना लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला जाईल, ज्याला ‘क्रिकेटचा मक्का’ असेही म्हटले जाते. 10 जुलैपासून सुरू होणाऱ्या या सामन्यापूर्वी, या मैदानावर भारतीय संघाने आतापर्यंत किती सामने जिंकले आहेत? चला तर मग या बातमीद्वारे आपण जाणून घेऊयात. (India vs England Lord’s Test)

भारतीय संघाने लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर आतापर्यंत 19 कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी भारताने खूप जास्त सामने जिंकले नसले तरी, 3 सामन्यांमध्ये विजय मिळवण्यात भारतीय संघ यशस्वी झाला आहे. या काळात भारतीय संघाला 12 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे, तर 4 सामने अनिर्णित राहिले आहेत. भारताने लॉर्ड्समध्ये 3 सामने जिंकले असले तरी, एकंदरीत भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही. त्यामुळे आता शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ कशी कामगिरी करतो हे पाहणे देखील महत्वाचे ठरेल. (India’s Test record at Lord’s)

दुसरीकडे, इंग्लंडबद्दल बोलायचे झाल्यास, यजमान संघाने येथे साहजिकच जास्त सामने खेळले आहेत. इंग्लंडने लॉर्ड्सवर आतापर्यंत 145 सामने खेळून त्यापैकी 59 सामने जिंकले आहेत आणि 35 सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. 51 सामने येथे अनिर्णित राहिले आहेत. भारताने ज्या पद्धतीने मालिकेतील दुसरा सामना जिंकला आहे, त्यामुळे इंग्लंडचा संघ सध्या तणावात असेल, कारण पुढचा सामना हातातून गेला तर मालिकेवरही संकट घोंगावेल. भारताने शेवटची मालिका 2007 मध्ये येथे जिंकली होती. आता या वेळी काय निकाल लागतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (England Test record at Lord’s)

भारतीय संघ सध्या जरी बदलाच्या टप्प्यातून जात असला तरी, युवा खेळाडूंच्या फळीनेही चांगली कामगिरी करून दाखवली आहे, त्यामुळे एक आशा निर्माण झाली आहे. आता तिसरा सामना मालिकेची दिशा ठरवेल. सध्याच्या माहितीनुसार, लॉर्ड्सची खेळपट्टी जास्त धावा काढण्यास अनुकूल नसेल, म्हणजेच यावेळी गोलंदाजांना मदत मिळू शकते आणि कदाचित खूप जास्त धावा होताना दिसणार नाहीत. (Test match preview Lord’s)

भारत आणि इंग्लंड संघात पहिला कसोटी सामना लीड्सच्या मैदानावर खेळला गेला होता. या सामन्यात बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने भारताचा 5 गडी राखून धुव्वा उडवला. त्यानंतर दुसरा कसोटी सामना एजबॅस्टनच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दमदार पुनरागमन केले. संघाने ऐतिहासिक विजय मिळवत इंग्लंडला 336 धावांनी धूळ चारली. आता तिसऱ्या कसोटी सामन्यात कोण बाजी मारणार? हे पाहणे मनोरंजक ठरेल.

Comments are closed.