HSC Exam Result 2025 The state’s result for Class 12th is 91.88 percent
आज दुपारी 1 वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन हा निकाल पाहता येणार आहे. पण निकालाच्या दोन तास आधी शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडली असून यामध्ये राज्याचा निकाल 91.88 टक्के लागल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे.
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षा झाल्यानंतर या परीक्षेचा निकाल नेमका कधी जाहीर होणार? याची उत्सुकता सर्वांनाच होती. अखेर तो दिवस उजाडला असून आज सोमवारी (ता. 5 मे) दुपारी 1 वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. पण नेहमीप्रमाणेच, निकालाच्या दोन तास आधी म्हणजेच सकाळी 11 वाजता शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडली असून यामध्ये राज्याचा निकाल 91.88 टक्के लागल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली असल्याचे शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. (HSC Exam Result 2025 The state’s result for Class 12th is 91.88 percent)
शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, कोकण या नऊ विभागांमधून 14 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 14 लाख 17 हजार 969 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 13 लाख 02 हजार 873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्यांची टक्केवारी 91.88 टक्के इतकी आहे. खासगी विद्यार्थ्यांची संख्या एकूण 36 हजार 133 इतकी होती, त्यापैकी 35 हजार 697 जणांनी परीक्षा दिली, त्यापैकी 29 हजार 892 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे 17 नंबर फॉर्म भरून परीक्षा दिलेल्या आणि त्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 73.73 टक्के इतकी आहे. तर पुर्नपरीक्षा अर्थात 42 हजार 024 रिपीटर्स विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षा दिली होती. त्यापैकी 15 हजार 823 रिपीटर्स विद्यार्थी उत्तीर्ण झाले. रिपीटर्स विद्यार्थ्यांची उत्तीर्ण टक्केवारी 37.65 टक्के इतकी आहे.
हेही वाचा… HSC Result 2025 : प्रतीक्षा संपली! आज दुपारी 1 वाजता जाहीर होणार बारावीचा निकाल
तसेच, यंदा बारावीच्या परीक्षेला 7 हजार 258 दिव्यांग विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 6 हजार 705 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. विभागीय निकालाची माहिती देताना शिक्षण अधिकाऱ्यांनी कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 96.74 टक्के इतका लागल्याचे जाहीर केले. तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे. लातूरमधून फक्त 89.74 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याशिवाय, विज्ञान शाखा – 97.35 टक्के, कला शाखा – 80.52 टक्के, वाणिज्य शाखा – 92.68 टक्के असा निकाल लागला आहे. तर, व्यवसाय अभ्यासक्रमात 83.03 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि आयटीआयचे 82.03 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विभागीय निकाल…
- पुणे – 91.32
- नागपूर – 90.52
- छत्रपती संभाजीनगर – 92.24
- मुंबई – 92.93
- कोल्हापूर – 93.64
- अमरावती – 91.43
- नाशिक – 91.31
- लातूर – 89.46
- कोकण – 96.74
Comments are closed.