दुसऱ्या कसोटीत खेळणार का जोफ्रा आर्चर? मायकल वॉनने इंग्लंडला दिला इशारा, म्हणाला ….
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत जोफ्रा आर्चरला खेळवण्याबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या चार वर्षांत आर्चरने नुकताच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले असून, त्याने ससेक्सकडून डरहमविरुद्ध खेळताना 18 षटकांत 32 धावा देत 1 बळी घेतला.
30 वर्षीय आर्चरने 2021 पासून एकही कसोटी सामना खेळलेला नाही. इंग्लंडचे निवडकर्ता ल्यूक राइट यांनी यापूर्वी सांगितले होते की, जर आर्चरने ससेक्सकडून चार दिवसीय सामना खेळला, तर तो 2 जुलैपासून होणाऱ्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध असेल.
परंतु वॉनने ‘बीबीसी टेस्ट मॅच स्पेशल’वर सांगितले, “सर्वात चांगली गोष्ट म्हणजे जोफ्राने पुनरागमन केले, पण मला त्याला अजून एक चार दिवसीय सामना खेळताना पाहायचं आहे. त्याने चार वर्षे कसोटी क्रिकेट खेळलेलं नाही. त्यामुळे केवळ एका सामन्यानंतर त्याला थेट कसोटीत खेळवणं म्हणजे घाई होईल. कसोटी क्रिकेट आणि काउंटी क्रिकेट यामध्ये मोठा फरक आहे. मी पहिल्या कसोटीतील विजयी संघात कोणताही बदल करणार नाही.”
ससेक्सचे मुख्य प्रशिक्षक पॉल फारब्रास यांनीही आर्चरच्या बाबतीत इंग्लंडने काळजीपूर्वक निर्णय घ्यावा, असं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी ‘द गार्डियन’शी बोलताना सांगितले, “जर मी निवड समितीचा भाग असतो, तर आर्चरला तिसऱ्या कसोटीसाठी राखून ठेवले असते. त्याने फक्त 18 षटकांचीच गोलंदाजी केली आहे. त्याच्याबाबतीत काळजी घेणे अत्यावश्यक आहे.”
फारब्रास पुढे म्हणाले, “संघात बदलाची काय गरज आहे? पहिल्या कसोटीत हेडिंग्लेमध्ये विजय मिळवला आहे, आणि मालिका चांगल्या पद्धतीने सुरू झाली आहे.”
Comments are closed.