शिवसेनेच्या वर्धापनदिनी मुंबईत भगवा जल्लोष

‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’, ‘उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आगे बढो, हम तुमारे साथ है’ अशा गगनभेदी घोषणा देत शीव येथील षण्मुखानंद सभागृहात मुंबईसह राज्यभरातून शिवसैनिक दाखल झाले. शिवसैनिकांच्या घोषणांनी शीव परिसर दणाणून गेला.

शिवसेनेच्या वर्धापन दिनाचा भगवा जल्लोष आज मुंबईत पाहायला मिळाला. शीव येथील षण्मुखानंद सभागृहात राज्यभरातील शिवसैनिकांनी दुपारपासून गर्दी केली होती. भगवे उपरणे, टोपी, भगवे सदरे आणि छातीवर शिवसेनेच्या मशाल चिन्हाचा बॅज अशा वेशात शिवसैनिक दाखल होत होते. उड्डाणपुलावर, सभागृहाबाहेर मोठे आकर्षक बॅनर्स सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणादायी विचारांशी एकनिष्ठ असलेले मुंबईसह राज्यभरातून शिवसैनिक षण्मुखानंद सभागृहात दाखल झाले. एकमेकांना ‘जय महाराष्ट्र’ म्हणत हसतमुख साद घालत होते. शिवसैनिकांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय विचार देणार, कोणता आदेश देणार हे ऐकण्याची उत्सुकता वाढत होती.  शिवसैनिकांबरोबर शिवसेनेच्या अंगीकृत संघटनांचेही पदाधिकारी ‘शिवसेना झिंदाबाद’च्या घोषणा देत कार्यक्रमस्थळी दाखल होत होते. भाजपच्या दांभिकतेला, एकहाती हुकूमशाहीला केवळ आणि केवळ शिवसेनाच पुरून उरेल, असा विश्वास असल्यामुळेच आम्ही उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असा निर्धार शिवसैनिकांनी बोलून दाखवला.

Comments are closed.