'ब्रह्मोस' च्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ

17 देशांनी केली खरेदी करण्याची इच्छा व्यक्त

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

‘सिंदूर’ अभियान यशस्वी करण्यात भारताच्या ब्राम्होस या क्षेपणास्त्रांनी गाजविलेला पराक्रम आता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचला आहे. त्यामुळे या क्षेपणास्त्रांची लोकप्रियता प्रचंड प्रमाणात वाढली असल्याचे दिसून येत आहे. 17 देशांनी ही क्षेपणास्त्रे भारताकडून खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

ब्राम्होस हे क्षेपणास्त्र बहुउपयोगी आणि बहुउद्दशीय आहे. ते भूमी, जल आणि वायू अशा तीन्ही स्थानांवरुन डागता येते. त्याची अचूकता वादातीत आहे. त्याची मारक शक्ती आणि विध्वंस करण्याची क्षमता अतुलनीय आहे. ही क्षेपणास्त्र यंत्रणा भारत आणि रशिया यांनी संयुक्तरित्या विकसीत केली असून त्यांचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षाही काही पट अधिक आहे. भूदल, वायूदल आणि नौदल या तिन्ही दलांकडून याचा सहजपणे उपयोग केला जाऊ शकतो, हे प्रमुख वैशिष्ट्या आहे.

सध्या फिलिपाईन्स हा देश ग्राहक

सध्या या क्षेपणास्त्रांच्या खरेदीसाठी केवळ फिलिपाईन्स या एकाच देशाने भारताशी निश्चित असा करार केला आहे. हा करार 37.5 कोटी डॉलर्सचा आहे. तो जानेवारी 2022 मध्ये करण्यात आला आहे. पण सिंदूर अभियानानंतर अनेक देश भारताकडे या क्षेपणास्त्रसंबंधी विचारणा करीत आहेत, अशी माहिती आहे.

अनेक देश रांगेत

इंडोनेशिया हा देश भारताशी या क्षेपणास्त्रांच्या संदर्भात चर्चा करीत आहे. हा देश 20 कोटी ते 35 कोटी डॉलर्सचा करार करु इच्छितो. व्हिएतनाम देश 70 कोटी डॉलर्सच्या करारासंबंधी चर्चा करीत आहे. मलेशियाला आपले वायुदल आणि नौदलासाठी ही क्षेपणास्त्रे हवाr आहेत. याशिवाय थायलंड, सिंगापूर, ब्रुनेई, ब्राझील, चीली, अर्जेंटिना, व्हेनेझुएला, इजिप्त, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतार, ओमान, दक्षिण आफ्रिका, बुल्गारिया, व्हेनेझुएला इत्यादी देशही ही क्षेपणास्त्रे विकत घेण्याची इच्छा बाळगत असून त्यांची भारताशी चर्चा सध्या विविध पातळ्यांवर होत आहे. एकंदर, हा भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष भारताला शस्त्रास्त्रांचा व्यापार करणारा देश अशी ख्याती मिळवून देण्याची नांदी ठरणार आहे काय, असा प्रश्न आता राजकीय आणि सामरिक वर्तुळांमध्ये चर्चिला जात आहे.

ब्राम्होसची वैशिष्ट्यो

याचा वेग 3 मॅक म्हणजे ध्वनीच्या वेगाच्या तिप्पट आहे. याचा पल्ला 290 किलोमीटरचा असून तो 500 किलोमीटरपर्यंत वाढविला जाऊ शकतो. याच्यावर 200 किलो ते 300 किलो वजनाची स्फोटके (वॉरहेड) बसविली जाऊ शकतात. ते 15 किलोमीटर उंचीवरुन उडते. ते भूमीवरील अत्यंत छोट्या लक्षाचाही वेध अचूकपणे घेऊ शकते. त्यामुळे त्याची परिणामकारकता अधिक आहे.

Comments are closed.