प्रयाग्राज मध्ये प्रचंड ट्रॅफिक जाम

अनेक तास भाविक प्रतिक्षेत, वाहनांची 30 किलोमीटरपर्यंत रांग

Vrtasantha / Prigaigraj

प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याची सांगता होण्यासाठी आता 16 दिवसांचा कालावधी उरला आहे. 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रदिनी ही सांगता होणार आहे. त्यामुळे भाविकांची प्रचंड गर्दी होत असून वाहतूक नियंत्रण यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. सोमवारी भाविकांच्या संख्येने उच्चांक गाठला होता. त्यामुळे त्रिवेणी संगमक्षेत्री जाण्यासाठीच्या मार्गांवर 30 किलोमीटरहून अधिक लांबीची रांग लागली होती. वाहने पुढे जात नसल्याने भाविकांना 10 ते 12 तास एकाच जागी थांबावे लागले होते. प्रशासनाने प्रयागराज येथींल रेल्वेस्थानक काहीकाळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने अनेक भाविकांवर रेल्वेंमध्येच अडकून पडल्याची वेळ आली.

सोमवारी साधारणत: 2 कोटी भाविकांनी पवित्र महाकुंभ स्नान केले, अशी माहिती देण्यात आली. तसेच या महाकुंभमेळ्याचा शुभारंभ झाल्यापासून आजपर्यंत 42 कोटींहून अधिक भाविकांनी महाकुंभात सहभाग घेतला आहे. हा आजवरचा विक्रम आहे. प्रशासनाने कितीही व्यवस्था केली, तरी ती अपुरी ठरेल इतका भाविकांचा प्रतिसाद या महापर्वणीला मिळत असल्याने भाविकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, ही बाब प्रशासनाने मान्य केली आहे.

विरोधी पक्षांची टीका

भाविकांच्या संख्येसमोर प्रशासनाने केलेली व्यवस्था अपुरी ठरत असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी भाविकांना होत असलेल्या त्रासासाठी उत्तर प्रदेशचे प्रशासन उत्तरदायी असल्याचा आरोप केला असून अकडलेल्या भाविकांना तातडीचे साहाय्य पुरवावे, अशी मागणी केली. प्रयागराजला येणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या वाटतेच थांबविण्यात आल्याने भाविकांचे हाल होत आहेत. त्यांना साहाय्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी ‘एक्स’वरुन प्रसारित केलेल्या संदेशात प्रतिपादन केले आहे. नबाबगंज आणि गौहानिया रेल्वे स्थानकांवर अनेक रेल्वेगाड्या अडकल्या आहेत.

20 किलोमीटरची चाल

भाविकांच्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था संगमस्थानापासून बरीच दूर आहे. तेथून घाटांवर स्नानासाठी पोहचण्यासाठी 20 ते 25 किलोमीटर चालावे लागत आहे. भाविकांच्या लांबच लांब रांगा पायवाटांवर लागल्या असून वेगाने पुढे जाणे भाविकांना अशक्य होत आहे, असे अनेक भाविकांचे म्हणणे आहे.

प्रशासनाने फेटाळले आरोप

महाकुंभ मेळ्याच्या व्यवस्थापनात प्रशासन अपयशी ठरले आहे, ही टीका अयोग्य असून प्रशासनाने पुरेशी व्यवस्था केलेली आहे. भाविकांची प्रचंड संख्या पाहता काहीवेळा वाहतुकीची कोंडी होते. तथापि, ती त्वरित सोडविली जाते. वाहतूक कोंडीत अडकलेल्या भाविकांना पाणी आणि अन्न पुरविण्याची सोय आहे. प्रशासनाने योग्य व्यवस्था केल्यामुळेच प्रतिदिन एक ते दीड कोटी लोक संगमस्थळी पोहचणे शक्य झाले आहे. प्रशासनाकडून भाविकांच्या सुरक्षेला सर्वाधित प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे संगमावर गर्दी होऊ नये आणि चेंगराचेंगरीची स्थिती येऊ नये, म्हणून विशिष्ट संख्येनेच भाविकांना तेथे सोडण्यात येत आहे. त्यामुळे भाविक त्यांच्या मार्गांवर काही काळ अडकून पडत आहेत, असे स्पष्टीकरण प्रशासनाकडुन देण्यात आले आहे. कुव्यवस्थापनाचा आरोप नाकारण्यात आला आहे.

Comments are closed.