हुमायून कबीर यांनी नवा पक्ष काढला.
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढविण्याची तयारी
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालच्या राजकारणात सोमवारी एक नवे नाव जोडले गेले आहे. तृणमूल काँग्रेसमधून निलंबित आमदार हुमायूं कबीर यांनी सोमवारी स्वत:च्या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. त्यांच्या या पक्षाचे नाव जनता उन्नयन पक्ष आहे. या पक्षाच्या राज्य समितीत 75 सदस्य असतील, ज्यात सुमारे 20 टक्के प्रतिनिधित्व हिंदू समुदायाचे असणार आहे. पक्षाची औपचारिक सुरुवात मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेलडांगा येथे एका जाहीर सभेदरम्यान केली जाणार असल्याचे कबीर यांनी सांगितले आहे.
मुर्शिदाबाद हा मुस्लीमबहुल जिल्हा असून या क्षेत्रात राज्याच्या एकूण 294 विधानसभा जागांपैकी 30 जागा आहेत. पुढील वर्षी मार्च-एपिलमध्ये येथे विधानसभा निवडणूक होणार आहे. तृणमूलमधू निलंबनानंतरही माझा राजकीय प्रवास संपलेला नाही. मी सर्वसामान्य लोकांसाठी काम करणर आणि प्रत्येक आव्हानाला सामोरे जाणार आहे. लवकरच माझ्या पक्षाचा झेंडा कोलकात्यापासून उत्तर बंगालच्या अनेक जिल्ह्यांमध्ये दिसून येणार असल्याचा दावा हुमायूं कबीर यांनी केला आहे.
100 हून अधिक जागा लढविणार
मुर्शिदाबाद हे माझे जन्मस्थान असून या जिल्ह्याशी माझे खास नाते आहेत, याचमुळे येथे पक्षाचा मजबूत प्रभाव निश्चित असल्याचे वक्तव्य कबीर यांनी केले आहे. लवकरच बरहामपूर येथून रोड शो काढणार आहे. माझा पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत 100 हून अधिक जागा लढविणार असून निकालानंतर सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
90 जागा जिंकण्याचे लक्ष्य
तृणमूल आणि भाजप या दोन्ही पक्षांचे विरोधक असलेल्या पक्षांनी पश्चिम बंगालमध्ये एकत्र येण्याची गरज आहे. माझे लक्ष्य अल्पसंख्याक मतांना एकजूट करणे आणि कमीतकमी 90 जागा जिंकणे आहे. माझा पक्ष मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भवानीपूर तर विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांच्या विरोधात नंदीग्राम मतदारसंघात उमेदवार उभा करणार असल्याचे कबीर यांनी सांगितले आहे.
पक्षचिन्हाची प्रतीक्षा
निवडणूक आयोगाकडून वाटपाच्या आधारावर पक्षाचे चिन्ह ‘टेबल’, ‘गुलाब’ किंवा ‘नारळाचे झाड’ असू शकते. माझी पहिली पसंत टेबल आहे. आमचा पक्ष माकप, आयएसएफ आणि काँग्रेससोबत आघाडी करणार आहे. 2026 च्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेस समाप्त होणार असल्याचा दावा कबीर यांनी केला आहे.
Comments are closed.