तर मी निवृत्ती मागे घेईन..’, लाईव्ह टीव्हीवर बाबर आझमची मोठी फजिती, मोहम्मद आमीरचा खळबळजनक दावा

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम बाबर आझमच्या (Babar Azam) नावावर असला, तरी स्ट्राइक रेटच्या बाबतीत तो खूपच मागे आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात बाबरचा स्ट्राइक रेट केवळ 112.33 आहे, जो अतिशय खराब मानला जातो. याच कारणामुळे आता पाकिस्तानचेच माजी क्रिकेटपटू टीव्हीवर बाबर आझमची खिल्ली उडवताना दिसत आहेत.
2026 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये 15 फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात हाय-व्होल्टेज सामना होणार आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या एका टीव्ही शोमध्ये माजी क्रिकेटपटू अहमद शहजाद, मोहम्मद आमीर आणि राशिद लतीफ यांनी बाबरबद्दल वादग्रस्त विधाने केली. अहमद शहजाद म्हणाला की, जर बाबर आझमने भारताविरुद्ध सामना जिंकवून देणारी खेळी केली, तर शोमधील सर्व प्रेक्षकांना माझ्याकडून मोफत जेवण (Free Food) दिले जाईल. तर राशिद लतीफने थेट शब्दांत सुनावले की, बाबरला तसेही फार काळ मोठी फलंदाजी करता येत नाही.
शोच्या सूत्रधाराने एक अट ठेवली की, जर बाबरने भारताविरुद्ध 160 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने सामना जिंकवून देणारी खेळी केली, तर मोहम्मद आमीर आपली निवृत्ती मागे घेईल का? यावर आमीरने उत्तर दिले की, दोन चेंडूत 8 धावा करून 400 चा स्ट्राइक रेट दाखवणे यात गृहीत धरले जाणार नाही. पण, जर बाबरने 150 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने अर्धशतक झळकावून पाकिस्तानला विजय मिळवून दिला, तर मी निवृत्ती मागे घेण्यावर विचार करेन.
विशेष म्हणजे, मोहम्मद आमीरने 2020 मध्ये पहिल्यांदा निवृत्ती घेतली होती, त्यानंतर 2024 च्या वर्ल्ड कपसाठी तो परतला आणि डिसेंबर 2024 मध्ये त्याने पुन्हा निवृत्ती घेतली होती.
Comments are closed.