पहिल्या आगळ्या त्रिशतकाची शंभरी

ऑस्ट्रेलियन फलंदाज बिली मरडॉकपासून सुरू झालेला कसोटीतील द्विशतकी खेळीचा प्रवास गेल्या 141 वर्षांत चारशतकापर्यंत पोहोचलाय. पण कसोटी क्रिकेटमध्ये हर्बर्ट सटक्लिफ यांच्याकडून साकारलेल्या पहिल्या आगळ्या त्रिशतकाला यंदा शंभर वर्षे झालीत. हिंदुस्थानी कर्णधार शुभमन गिलनेही अनोखे चारशतक साकारत त्या पराक्रमाची आठवण ताजी केलीय.

कसोटी क्रिकेटच्या 148 वर्षांच्या इतिहासात सध्या 2593 वा कसोटी सामना सुरू असून यात आजच्या तारखेपर्यंत सुमारे 4390 कसोटी शतके झळकवली गेली आहेत. यात शुभमन गिलचे द्विशतक 383 वे ठरलेय. तर त्रिशतकांचा आकडा फक्त 32 पर्यंतच पोहोचलाय आणि चौशतक ठोकण्याचा विश्वविक्रम ब्रायन लाराच्या नावावर कायम आहे. लाराबद्दल बोलायचे झाले तर त्याने गॅरी सोबर्स यांनी 1958 साली रचलेला 365 धावांचा विश्वविक्रम त्याने 1994 साली 375 धावांची खेळी करून मोडला. मग नऊ वर्षांनी मॅथ्यू हेडनने 380 धावांची खेळी करत तो विक्रम आपल्या नावावर केला. मात्र हा विश्वविक्रम सहा महिनेच टिकला. लाराने 12 एप्रिल 2004 ला हेडनचा विक्रम मोडीत काढत कसोटी इतिहासातील पहिले चौशतक साकारण्याचा इतिहास घडवला.

कसोटी क्रिकेटच्या 127 वर्षांच्या (2004 साली) इतिहासात कुणालाच हा पराक्रम जमला नव्हता. मात्र 1990 साली इंग्लंडचे महान फलंदाज ग्रॅहम गूच यांनी हिंदुस्थानविरुद्ध लॉर्ड्स कसोटीत 333 आणि 123 अशा खेळ्या करत 456 धावा केल्या होत्या. एका कसोटीच्या दोन्ही डावांत मिळून केलेली ही विश्वविक्रमी धावसंख्या 35 वर्षांनंतरही अबाधित आहे. मात्र गेल्या 35 वर्षांत चार फलंदाजांनी कसोटीच्या दोन्ही डावांत मिळून 400 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. शनिवारी गिलला गूच यांच्या 456 धावांना मागे टाकण्याची संधी होती, पण तो 161 धावांवर बाद झाला आणि त्याचा दोन्ही डावांतील धावसंख्येचा आकडा 430 धावांवर थांबला. मात्र गिलने हिंदुस्थानच्या सुनील गावसकर आणि विराट कोहली यांचे विक्रम मोडीत काढले. तसेच मार्क टेलर (426) आणि कुमार संगक्कारा (424) या दोन फलंदाजांनीही गूच यांना मागे टाकण्याचा प्रयत्न केला होता.

दोन्ही डावांत द्विशतके अजूनही अशक्यच

कसोटीत दोन्ही डावांत शतक, एका डावात द्विशतक आणि शतक, एका डावात त्रिशतक आणि शतक असे पराक्रम केले गेले आहेत. पण एका डावात द्विशतक आणि दुसऱ्या डावात दीडशतक ठोकणारा गिल पहिलाच आहे. तसेच कसोटीच्या दोन्ही डावांत द्विशतकी खेळी करण्याचा पराक्रम अद्याप कुणाला जमला नसला तरी प्रथम श्रेणी क्रिकेटच्या दोन शतकांच्या इतिहासात आर्थर पॅग (पेंट) आणि अँजेलो परेरा (नंदेस्क्रिप्ट) या दोन फलंदाजांनाच दोन्ही डावांत द्विशतक ठोकता आलेय.

सटक्लिफ यांनी केला पराक्रम

कसोटीतील सॅण्डहॅम यांच्या त्रिशतकाआधी 1925 साली ऑस्ट्रेलियाच्या हर्बर्ट सटक्लिफ यांनी दोन्ही डावांत 176 आणि 127 अशा खेळ्या करत कसोटीत 303 धावा करत पहिलेवहिले अनोखे त्रिशतक साकारले होते. मग 1930 साली इंग्लिश फलंदाज अ‍ॅण्डी सॅण्डहम (325) यांनी कसोटीतील एका डावातील पहिले त्रिशतक फलकावर लावले. मग त्यांनी दुसऱ्या डावात 50 धावा करत कसोटीत 375 धावा करण्याचा भीमपराक्रमही केला. हा एका कसोटीतील एकूण धावांचा विक्रम तब्बल 60 वर्षांनतर गूच यांनी 1990 साली मोडला. जो आजही अबाधित आहे.

Comments are closed.