रंगू लागली हुरडा पार्टी

>> विवेक पानसे

शेतात खड्डा करून पेटविण्यात येणारी आगटी, त्यामध्ये भाजण्यात येणारी ज्वारीची कोवळी कणसं आणि खोबरं, शेंगदाण्याची चटणी आणि गुळाचा खडा असा हुरड्याचा बेत काही औरच असतो. गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढू लागला असून, अनेकांना हुरडा पार्टीचे वेध लागण्यास सुरुवात झाली असून, शनिवारी आणि रविवारी आयोजित केल्या जाणाऱ्या हुरडा पाट्र्त्यांवर नागरिक ताव मारताना दिसू लागले आहेत.

ग्रामीण भागात कृषी पर्यटन केंद्र मोठ्या प्रमाणावर वाढू लागले असून, गेल्या काही दिवसांपासून कृषी पर्यटन केंद्रांवर अशा हुरडा पार्थ्यांचे आयोजन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

यंदा अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने अनेक भागातील ज्वारीच्या पिकांवर परिणाम झाला. मात्र, पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गेल्या काही दिवसांत राज्यभरात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. त्यामुळे काही ठिकाणी ज्वारीचे पीक जोमात असल्याने हुरडा पाट्र्यांचे आयोजन करण्यात येत असल्याचे शेतकरी बाळकृष्ण शिंदे यांनी सांगितले.

मीडियावर जाहिरात

पुणे जिल्ह्यातील हुरडा पाट्यांच्या जाहिराती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या आहेत. इन्स्टाग्राम, फेसबुकवर हुरडा पार्थ्यांच्या जाहिराती दिसू लागल्या आहेत. यामध्ये हुरडा पार्टीसह अन्य विविध सुविधादेखील पुरवण्यात येत असून, त्यासाठी नागरिक हजारो रुपये मोजत असल्याचे पाहायला मिळत आहे.

हुरड्याबरोबर ग्रामीण खाद्यसंस्कृतीचा आस्वाद

सध्या आयोजित करण्यात येणाऱ्या पार्थ्यांमध्ये हुरडा खाण्याबरोबरच ग्रामीण खाद्यसंस्कृतीच्या पदार्थांवर ताव मारण्यास अनेक जण पसंती देत आहेत. बाजरीची भाकरी, पिठलं, थालीपीठ, मिरचीचा ठेचा आणि तोंडी लावण्यासाठी कांदा अशा ग्रामीण जेवणाची चव नागरिकांच्या जिभेवर रेंगाळू लागली आहे.

Comments are closed.