कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या करून पतीने जीवन संपवले, अहिल्यानगरमध्ये खळबळ
कौटुंबिक भांडणातून पत्नीची हत्या करून पतीने देखील गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात चासनळी गावात शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी कोपरगाव पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
दिलीप शंकर मिजगुले (60) आणि स्वाती मिजगुले (54) अशी मयत पती-पत्नीची नावे आहेत. दिलीप यांचा चहाचा व्यवसाय होता तर स्वाती या अंगणवाडी सेविका आहेत. पत्नीची उशीने तोंड दाबून हत्या केल्यानंतर पतीने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.
सकाळपासून घराचा दरवाजा बंद असल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी खिडकीतून आत डोकावले असता घरातील दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. तात्काळ ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच शिर्डी उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्यासह कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
मृत्यूपूर्वी दिलीप यांनी घरातील भिंतीवर काहीतरी मॅसेज लिहून ठेवला आहे. मात्र नेमके काय लिहिले आहे हे तपासानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. पुढील तपास कोपरगाव पोलीस करत आहेत.
Comments are closed.