बायको नांदायला येत नाही म्हणून चार मुलांसह नवऱ्याची आत्महत्या, राहाता तालुक्यातील घटनेने खळबळ

बायको नांदायला येत नाही, या कारणावरून नवरा अरुण काळे (वय 30, रा. चिखली कोरेगाव, ता. श्रीगोंदा) यांनी चार चिमुकल्या मुलांसह विहिरीत आत्महत्या केली. राहाता तालुक्यातील कोऱहाळे शिवारात घडलेल्या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

अरुण काळे (वय 30), शिवानी अरुण काळे (वय 8), प्रेम अरुण काळे (वय 7), वीर अरुण काळे (वय 6), कबीर अरुण काळे (वय 5, सर्वजण रा. चिखली कोरेगाव, ता. श्रीगोंदा) अशी मृतांची नावे आहेत.

अरुण काळे यांनी मुलगी शिवानी व तीन मुले प्रेम, वीर, कबीर यांना विहिरीत ढकलून स्वतः उडी घेत आत्महत्या केली. घटनास्थळी पोलीस व ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू केले असून, तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे, तर अद्यापही दोनजणांचा शोध सुरू आहे.

अरुण काळे यांचा मृतदेह एक हात व एक पायाला दोरीने बांधलेल्या अवस्थेत आढळला असून, त्यांनी स्वतः हात-पाय बांधून आत्महत्या केली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

काळे कुटुंबातील वादामुळे पत्नी आठ दिवसांपूर्वी येवला येथे माहेरी गेली होती. याच कारणावरून संतापाच्या भरात अरुण काळे यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. घटनास्थळापासून काही अंतरावर त्यांची मोटारसायकलदेखील आढळली आहे. या घटनेची नोंद राहाता पोलिसांनी घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.

घटनेचे गांभीर्य समजताच, शिर्डी पोलीस उपअधीक्षक शिरीष वमणे, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, राहात्याचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते.

Comments are closed.