IPL 2025: कमिन्सच्या हैदराबादचे प्लेऑफचे स्वप्न भंगले! पावसाने दाखवला बाहेरचा रस्ता
आयपीएल 2025 मधील 55वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स (SRH vs DC) संघात हैदराबादच्या स्टेडियमवर रंगला होता. पण हा सामना पावसामुळे वाया गेला आहे. सामना रद्द झाल्यामुळे पॅट कमिन्सच्या हैदराबादला मोठा धक्का बसला. संघ आता प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी केल्यानंतर फक्त 133 धावा केल्या होत्या, परंतु दुसरा डाव सुरू होण्यापूर्वीच पाऊस पडला. सुमारे दीड तास पाऊस पडला. त्यानंतर परिस्थिती खेळण्यास योग्य नसल्याने पंचांनी सामना रद्द घोषित केला.
नियमांनुसार, सामना रद्द झाला तेव्हा दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आले होते. दिल्लीच्या आशा अजूनही कायम आहेत, पण हैदराबादचा प्रवास इथेच संपला. हैदराबादमध्ये रात्री 9.30 वाजता पाऊस सुरू झाला. पावसामुळे सनरायझर्सचा डाव सुरू होऊ शकला नाही. प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी हैदराबादला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकायचा होता. पण आता हैदराबाद प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.यंदाच्या आयपीएल हंगामातून आतापर्यंत 3 संघ बाहेर पडले आहेत. प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला हैदराबाद तिसरा संघ ठरला. यापूर्वी एमएस धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रियान परागचा राजस्थान रॉयल्स (RR) संघ देखील प्लेऑफमधून बाहेर पडले आहेत. दिल्ली कॅपिटल्सबद्दल बोलायचे झाले तर, त्यांचे 11 सामन्यांत 13 गुण आहेत. संघाच्या आशा अजूनही कायम आहेत. गुणतालिकेत दिल्ली पाचव्या स्थानी आहे.
दिल्लीने हैदराबादला 134 धावांचे लक्ष्य दिले होते. टॉस गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही. करुण नायर खाते न उघडता बाद झाला. त्याला पॅट कमिन्सने बाद केले. त्यानंतर तिसऱ्या षटकात फाफ डू प्लेसिस देखील फक्त 6 धावा करून बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला अभिषेक पोरेल 8 धावा करून बाद झाला. पॅट कमिन्सने तिघांनाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
15 धावांवर 3 विकेट्स पडल्या तेव्हा सर्वांना केएल राहुल आणि कर्णधार अक्षर पटेलकडून मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु त्यांचीही बॅटही चालली नाही. 10 धावा करून राहुल बाद झाला आणि 6 धावा करून अक्षर पटेल बाद झाला.29 धावांवर 5 विकेट्स पडल्यानंतर विप्रज निगम आला आणि त्याने ट्रिस्टन स्टब्ससोबत 33 धावांची भागीदारी केली. विप्रज धावबाद झाला. त्याने 17 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 18 धावा केल्या.
62 धावांत 6 विकेट्स पडल्यानंतर, आशुतोष शर्माने प्रतिआक्रमण केले. आशुतोषने 26 चेंडूत 41 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून 2 चौकार आणि 3 षटकार निघाले. स्टब्स 36 चेंडूत 4 चौकारांसह 41 धावांवर नाबाद राहिला. दोघांनी 45 चेंडूत 66 धावा जोडल्या. हैदराबादकडून कर्णधार पॅट कमिन्सने (Pat Cummins) सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. याशिवाय जयदेव उनाडकट, हर्षल पटेल आणि इशान मलिंगा यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.
Comments are closed.