‘मला खात्री आहे की..’, आशिया कप 2025 स्पर्धेआधी वीरेंद्र सेहवाग यांची मोठी भविष्यवाणी, चाहत्यांमध्ये खळबळ निर्माण!
माजी भारतीय सलामीवीर वीरेंद्र सहवाग (Virendra Sehwag) यांचं मत आहे की, सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखालील गतविजेता भारतीय संघ हा आठ देशांच्या आशिया कपमधला (Asia Cup) “सर्वोत्कृष्ट संघ” आहे आणि त्यांनी या संघाला आपला किताब टिकवून ठेवण्यासाठी पाठिंबा दर्शवला आहे. यंदा ही खंडीय स्पर्धा टी20 स्वरूपात होणार आहे, जेणेकरून पुढील वर्षी भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी20 विश्वचषकाची तयारी होऊ शकेल.
आशिया कपचे अधिकृत प्रसारक सोनी स्पोर्ट्स नेटवर्क सोबतच्या खास संवादात सेहवाग म्हणाले, आपण विश्वविजेते आहोत. आपण नुकताच विश्वचषक, टी20 विश्वचषक जिंकला आहे आणि मला खात्री आहे की आपण आशिया कपमध्ये सर्वोत्तम संघ आहोत.
ते पुढे म्हणाले, मला वाटतं आमचा संघ खूप चांगला आहे आणि ‘स्काय’ (सूर्यकुमार यादव) पुढे येऊन नेतृत्व करत आहे. तो टी20 स्वरूपात एक अव्वल खेळाडू आहे. त्याच्या नेतृत्वात आपण निश्चितच उत्तम खेळ करू. कारण आपण आधी पाहिलं आहे की, स्कायने जेव्हा नेतृत्व केलं, तेव्हा आपण बरेच टी20 सामने जिंकले. मला खात्री आहे की आपण आशिया कपही जिंकू.
अनुभवी फलंदाज सहवाग यांनी पुढे आशिया कपचं महत्त्व अधोरेखित करताना म्हटलं, माझ्या मते टी20 स्वरूपात हा आशिया कप म्हणजे 2026 च्या टी20 विश्वचषकासाठी तयारी करण्याची मोठी संधी आहे. यातून कोणत्या नवीन खेळाडूंना संधी द्यावी आणि कोणाला संघात घ्यावं हे ठरवता येईल. विश्वचषकासाठी संघ बांधणी सुरू करता येईल. भारतीय संघासाठी स्वतःची ताकद तपासण्यापेक्षा चांगली संधी नाही.
संघ निवडीवर उठलेल्या टीकेला उत्तर देताना सेहवाग म्हणाले, आपल्याकडे उत्तम टी20 निवड समिती आहे. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar yadav) नेतृत्वाखाली संघाने टी20 सामने छान खेळले आहेत. मला खात्री आहे की निवडकर्ते संघाला सर्वोत्तम खेळाडूंचा ताफा देतील आणि आपण यंदाची स्पर्धा जिंकू शकतो.
आशिया कपचा 17 वा हंगाम 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिरातीत होणार आहे. जानेवारीत इंग्लंडविरुद्धची मालिका 4-1 ने जिंकल्यानंतर भारताचा हा पहिला टी20 आंतरराष्ट्रीय सामना असेल. भारत आपला गट-अ मधील मोहिमेची सुरुवात 10 सप्टेंबरला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर युएईविरुद्ध करेल. त्यानंतर 14 सप्टेंबरला याच मैदानावर पाकिस्तानविरुद्धचा महत्त्वाचा सामना खेळेल आणि 19 सप्टेंबरला अबू धाबीतील शेख जायद क्रिकेट स्टेडियमवर ओमानचा सामना करेल.
Comments are closed.