शाहरुख आणि फराह खान मुळेच माझं पहिलं घर झालं; श्रेयस तळपदेने चाहत्यांसोबत शेअर केली खास आठवण
अभिनेता श्रेयस तळपदेने त्याच्या कारकिर्दीतील एक खास आठवण चाहत्यांसोबत शेअर केली आहे. आज नावारूपाला आलेला हा अभिनेता एकेकाळी स्वतःचं घर घेण्यासाठी संघर्ष करत होता. त्यावेळी अभिनेता शाहरुख खान आणि दिग्दर्शिक फराह खान यांच्या मदतीमुळेच पहिलं घर खरेदी करणं शक्य झाल्याचं त्याने नुकतेच एका मुलाखतीमध्ये सांगितलं.
‘मर्दिनी’ चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत आणि फराह खानच्या यूट्यूब व्लॉगमध्ये श्रेयसने हा किस्सा उलगडला. ‘ओम शांती ओम’च्या आठवणींना उजाळा देताना तो म्हणाला की, त्याच चित्रपटामुळे त्याचं स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न साकार झालं.
श्रेयसच्या म्हणण्यानुसार, त्या काळात त्याचं आर्थिक प्रोफाइल बँकेच्या होम लोनच्या निकषांमध्ये बसत नव्हतं. त्यामुळे कर्ज मिळण्याची शक्यता कमी होती. बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे भविष्यातील प्रोजेक्ट्सची माहिती मागितली. त्यावेळी त्याने शाहरुख खानसोबत ‘ओम शांती ओम’मध्ये काम करत असल्याचं सांगितलं. त्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शन फराह खान करत असल्याचं समजताच बँकेने दोघांकडून शिफारसपत्र मिळू शकते का, अशी विचारणा केली.
श्रेयसने ही गोष्ट त्याने फराह खानला सांगितली. फराहने तत्काळ शाहरुख खानशी चर्चा केली आणि दोघांनीही कोणताही विलंब न लावता आवश्यक पत्र देण्यास सहमती दर्शवली. त्या पत्रानंतर बँकेने त्याचं होम लोन मंजूर केलं आणि त्याचं पहिलं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झालं.
या आठवणीबद्दल बोलताना श्रेयसने शाहरुख आणि फराह यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या एका छोट्याशा मदतीमुळे आयुष्यातील मोठं स्वप्न पूर्ण झालं, असं तो म्हणाला. श्रेयसचा हा अनुभव सध्या सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत असून चाहत्यांकडून सकारात्मक प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.
Comments are closed.