खरे कारण सांगू शकत नाही… ‘जन नायकन’च्या विलंबावर दिग्दर्शक एच. विनोथ यांची पहिली प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दाक्षिणात्य सुपरस्टार आणि राजकारणात सक्रिय झालेल्या विजयच्या आगामी ‘जन नायकन’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप निश्चित न झाल्याने चाहत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अशातच चित्रपटाचे दिग्दर्शक एच. विनोथ यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. अलीकडेच एका चित्रपटाच्या प्रचार कार्यक्रमात विनोथ उपस्थित होते. यावेळी त्यांना ‘जन नायकन’च्या प्रदर्शनाबाबत प्रश्न विचारण्यात आला. अनेक महिन्यांपासून चित्रपट रखडल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

मात्र थेट उत्तर देण्याऐवजी विनोथ म्हणाले, “चित्रपट कधी प्रदर्शित होईल, हे माझ्या हातात नाही. खरे कारण सांगण्याचे धाडस माझ्यात नाही आणि ते सांगितले तरी ते ऐकण्याची तयारी तुमच्यात नसेल,” असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला, पण त्याचवेळी चित्रपटाच्या विलंबामागील कारणांबाबत उत्सुकताही अधिक वाढली. ‘जन नायकन’ हा विजयच्या कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाचा चित्रपट मानला जात आहे. विजयने राजकारणात पूर्णवेळ सक्रिय होण्याचा निर्णय घेतल्यानंतर हा त्याचा शेवटचा चित्रपट असू शकतो, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. असे वृत्त दैनिक जागरणने दिले आहे.

विजयसोबत या चित्रपटात ममिता बैजू, बॉबी देओल आणि पूजा हेगडे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्याचे सांगितले जात असले तरी प्रदर्शनाचा मार्ग अद्याप मोकळा झालेला नाही. काही वृत्तांनुसार चित्रपटाला सेन्सॉर मंडळाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. दरम्यान, जून महिन्यात विजयच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘जन नायकन’ प्रदर्शित होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 19 किंवा 22 जून या तारखांपैकी एखाद्या दिवशी चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो, अशा चर्चा रंगल्या आहेत. मात्र याबाबत निर्मात्यांकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Comments are closed.