‘मी पाहिलेल्यांपैकी हे सर्वश्रेष्ठ’, भारताच्या ‘या’ गोलंदाजाच्या खेळीचे वसीम अक्रम यांच्याकडून कौतुक

पाकिस्तानचे महान वेगवान गोलंदाज वसीम अक्रम (Wasim Akram) यांनी ओव्हलमध्ये इंग्लंडविरुद्ध अवघ्या 6 धावांनी मिळालेल्या रोमांचक विजयानंतर मोहम्मद सिराज (Mohmmed Siraj) आणि भारताच्या युवा कसोटी संघाचं भरभरून कौतुक केलं आहे. क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांपैकी एक मानले जाणारे माजी डावखुरे दिग्गज वसीम अक्रम यांनी टेलिकॉम आशिया स्पोर्टला दिलेल्या खास मुलाखतीत सिराजच्या खेळीला ‘अलिकडच्या काळात मी पाहिलेल्यांमध्ये सर्वश्रेष्ठ’ असं संबोधलं.

सिराजने 5 सामन्यांच्या मालिकेत 24.30 च्या सरासरीने 23 विकेट्स घेतल्या. शेवटच्या दिवशी पहिल्या सत्रात त्याने अफलातून गोलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. सिराजच्या या कामगिरीबद्दल बोलताना वसीम अक्रम म्हणाले, 5 कसोटी सामन्यात जवळपास 186 षटकं टाकूनही शेवटच्या दिवशी इतक्या आक्रमक पद्धतीने गोलंदाजी करणं म्हणजे अद्भुत सहनशक्ती आणि मानसिक ताकदीचं दर्शन आहे.

अक्रम पुढे बोलताना सिराजबद्दल म्हणाले, तो आता फक्त सहाय्यक गोलंदाज राहिलेला नाही, तर आक्रमणाचं नेतृत्व करत आहे आणि ते मनापासून करत आहे. इतकंच नव्हे, तर हॅरी ब्रूकचा 19 धावांवर झेल सुटला तरी त्याने आपलं लक्ष ढळू दिलं नाही. हीच खरी योद्ध्याची ओळख असते.

वसीम अक्रम अक्रम यांनी जसप्रीत बुमराहबद्दल (Wasim Akram on Jasprit Bumrah) देखील भाष्य केलं. त्यांनी कार्यभार व्यवस्थापनासाठी मालिकेतील शेवटच्या दोन कसोटी सामन्यात बुमराहला विश्रांती देणाऱ्या भारताच्या रोटेशन धोरणाचं कौतुक केलं. ते म्हणाले, आपल्या सर्वोत्तम गोलंदाजाला विश्रांती देण्यासाठी धाडसी संघाची गरज असते. पण भारताकडे पुरेशी बेंच स्ट्रेंथ होती आणि ही योजना पूर्णपणे यशस्वी ठरली.

वसीम पुढे म्हणाले, 2025 मध्ये आशिया कप (Asia Cup) आणि 2026 मध्ये टी20 विश्वचषक होणार आहे. त्यामुळे अशा प्रकारची दूरदृष्टी आवश्यक आहे. बुमराह हा सर्व फॉरमॅटमध्ये महत्त्वाचा आहे आणि त्याचं योग्य व्यवस्थापन होणं खूप गरजेचं आहे.

Comments are closed.