‘बुमराहला स्लोअर बॉल टाकायला मी शिकवलं..’ पाकिस्तानी गोलंदाजाचा मोठा दावा!

भारतीय संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आजच्या काळात कोणत्याही ओळखीचा मोहताज नाही. त्याच्या दमदार गोलंदाजीचे संपूर्ण जग कौतुक करते. युवा गोलंदाज त्याच्याकडून गोलंदाजीतील बारकावे शिकू इच्छितात. त्याच्या ‘स्लोअर बॉल’चा (धीम्या चेंडूचा) प्रत्येकजण चाहता आहे. अशा परिस्थितीत जर कोणी म्हटले की, बुमराहने स्लोअर बॉल टाकण्याची कला त्यांच्याकडून शिकली आहे, तर त्यावर विश्वास ठेवणे कठीण होते. पण हे सत्य आहे. पाकिस्तानी वंशाचा गोलंदाज जहूर खान याने एक मोठे विधान केले आहे. बुमराहने स्लोअर चेंडू टाकण्याची कला आपल्याकडून शिकल्याचा दावा त्याने केला आहे.
पाकिस्तानमध्ये जन्मलेला आणि युएईचा (UAE) वेगवान गोलंदाज असलेल्या जहूर खानचे म्हणणे आहे की, आयपीएल २०१९ साठी मुंबई इंडियन्सच्या संघाने त्याची ‘नेट बॉलर’ म्हणून निवड केली होती. त्याच काळात त्याने ही कला बुमराहला शिकवली होती. ३६ वर्षीय गोलंदाजाने सांगितले की, “मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. बुमराह आधीही स्लोअर बॉल टाकायचा, पण तो सामान्य ॲक्शनने टाकायचा. अबू धाबीमधील एका सामन्यादरम्यान त्याने, ट्रेंट बोल्ट आणि नॅथन कुल्टर-नाईल यांनी खूप धावा दिल्या होत्या. त्यावेळी आयपीएल सप्टेंबरमध्ये खेळले जात होते. सप्टेंबरमध्ये युएईमध्ये तापमान जवळपास ५० अंशांच्या आसपास असते. खूप उष्णता असते. रात्री चेंडू ओला होत असल्यामुळे त्यावर पकड मिळवणे कठीण जाते.”
जहूरने पुढे सांगितले की, “मुंबई इंडियन्सने मला कॅंपमध्ये बोलावले. सुमारे सहा दिवस मी क्वारंटाईनमध्ये घालवले. सातव्या दिवशी मी सरावासाठी गेलो. त्या रात्री मी टीमसोबत होतो. झहीर खान आणि रॉबिन सिंग मला आधीपासून ओळखत होते, कारण मी टी-१० लीगमध्ये एक ओव्हर मेडन टाकली होती. त्या षटकात मी पहिला चेंडू यॉर्कर टाकला होता आणि पुढचे पाच चेंडू स्लोअर टाकले होते. आम्ही सर्व सोबत बसलो होतो. बुमराह आला आणि तो समोरच बसला. रोहित शर्मा सुद्धा तिथेच होता. मी त्यांना बसलेले पाहत होतो.”
जहूर म्हणाला, “त्याच ॲक्शनमध्ये, त्याच ग्रिपसह (पकड) हे कसे शक्य आहे? असे त्यांनी विचारले. मी म्हणालो, मी तुम्हाला प्रॅक्टिस दरम्यान सांगेन. ते म्हणाले ठीक आहे, पुढच्या प्रॅक्टिसमध्ये मला सांग. मी म्हणालो ठीक आहे. जेव्हा सरावाची वेळ आली तेव्हा मी गोलंदाजी करत होतो. शेन बॉन्ड मुंबई इंडियन्सचे बॉलिंग कोच होते आणि महेला जयवर्धने नेटच्या मागे उभे होते. मी आलो आणि एक स्लोअर बाऊन्सर टाकला. समोरचा फलंदाज पूर्णपणे चकवा खाऊन गेला. बॉन्डने विचारले तुझी ग्रिप काय आहे? तू ऑफ-कटर टाकतोस का? मी म्हणालो नाही, माझी ग्रिप तीच आहे.”
जहूरने शेवटी सांगितले की, “सुमारे एक-दोन दिवसांनंतर मी बुमराहसोबत गोलंदाजी करत होतो. त्याने मला विचारले की तुमची ग्रिप दाखवा. त्यानंतर मी त्याला दोन-तीन स्लोअर बॉल्स टाकून दाखवले, तेही त्याच ग्रिपसह. मग त्याने जयवर्धनेला सांगितले की, बघा क्रिकेटमध्ये ही एक नवीन गोष्ट आहे. तो एकाच ॲक्शन आणि आर्म स्पीडसह किती चांगल्या प्रकारे स्लोअर बॉल टाकतो, हे जयवर्धनेला दाखवले.”
जहूर म्हणाला, “त्यानंतर त्याने (बुमराहने) गोलंदाजी केली आणि म्हणाला की हे तर ‘नेक्स्ट लेव्हल’ आहे. तो म्हणाला, तुम्ही सध्या युएईसाठी खेळत आहात, पण तुम्ही वर्ल्ड क्लास गोलंदाज आहात. मला ही गोष्ट खूप आवडली की तो एवढा मोठा स्टार असूनही मला विचारत होता.” दरम्यान, जहूरच्या या दाव्याची अद्याप अधिकृत पुष्टी होऊ शकलेली नाही.
Comments are closed.