द्रमुक सोडेपर्यंत मी बूट घालणार नाही!

तामिळनाडूतील भाजप नेते के. अण्णामलाई यांची प्रतिज्ञा

वृत्तसंस्था / चेन्नई

तामिळनाडूतून द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाची सत्ता जात नाही, तोपर्यंत मी पायांमध्ये पादत्राणे घालणार नाही, अशी प्रतिज्ञा या राज्यातील भारतीय जनता पक्ष शाखेचे अध्यक्ष के. अण्णामलाई यांनी केली आहे. तामिळनाडूतील अण्णा विद्यापीठाच्या एका विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण झाल्याची घटना घडली असून या घटनेतील आरोपी द्रमुक पक्षाशी संबंधित असल्याची चर्चा आहे. ही घटना समोर आल्यामुळे व्यथित झालेल्या अण्णामलाई यांनी ही प्रतिज्ञा गुरुवारी घोषित केली.

तामिळनाडूत 2026 मध्ये पुढची विधानसभा निवडणूक होणार आहे. सध्या या राज्यात द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाचे पूर्ण बहुमताचे सरकार आहे. या सरकारमध्ये काँग्रेस आणि इतर काही द्रविड पक्षांचाही सहभाग आहे. विरोधी पक्षात अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम आहे. भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची संख्या या राज्यात केवळ चार आहे. आणखी साधारणत: दीड वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत द्रमुकला सत्तेबाहेर काढण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाने केला आहे. अण्णा द्रमुक पक्षानेही यासाठी कंबर कसली आहे. या दोन्ही पक्षांमध्ये युती झाल्यास द्रमुकसमोर आव्हान उभे राहू शकते, असे बोलले जात आहे. अद्याप निवडणूक दूर असली तरी, विरोधी पक्ष आतापासूनच सज्ज होत आहेत. भारतीय जनता पक्षानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Comments are closed.